ठाकरे गटाच्या शिवसेनेने उमेदवारांच्या यादीतून एक नाव वगळले
Thackeray's Shiv Sena dropped one name from the list of candidates
महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली खरी,
मात्र दुसऱ्याच दिवशी त्यातून एक नाव वगळण्याची वेळ ठाकरे गटावर आली आहे. कारण ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’तून छापण्यात आलेल्या उमेदवार यादीत ६५ पैकी केवळ ६४ जणांचीच नावं आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दैनिक सामनामध्ये आज ठाकरे गटाच्या ६४ उमेदवारांची नावं फोटोसह छापण्यात आली आहेत. यामध्ये कालच्या ६५ जणांच्या यादीतील केवळ ६४ उमेदवारांची नावं आहेत.
यादीत रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश नाही. धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत पाटलांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
दरम्यान, परांड्याचा उमेदवार बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे. या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाकडून राहुल मोटे यांनी परांड्यावर दावा केला आहे. विशेष म्हणजे, जागावाटपावर तोडगा निघत आहे,
तोपर्यंत कुठल्याही चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नका, असं आवाहन राहुल मोटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
राहुल मोटे सलग तीन वेळा परांडा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. गेल्या विधानसभेला तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती.
त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात असतानाच ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आलं. संजय राऊत यांनी
पत्रकार परिषदेनंतर यादीत काही प्रशासकीय कारणावरुन दुरुस्ती करण्याचे संकेत दिले होते. ही दुरुस्ती आणि बदल हेच असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे.
दुसरीकडे, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले होते. आमदार कैलास पाटील यांची निष्ठावान म्हणून जिल्ह्यात तसेच राज्यात ओळख आहे.
पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे, त्यांची लढत कोणाशी होणार हे अद्याप तरी निश्चित झालेले नाही. कारण महायुतीकडून कळंब धाराशिव मतदारसंघातील उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही.