“या” दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली
These legendary leaders had to taste the dust of defeat

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. यात काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या अतुल भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. तर, संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या अतुल खताळ यांनी आस्मान दाखवलं.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू होती. मात्र, काँग्रेसमधील हे दोन बडे नेते पराभूत झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
विदर्भात तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर पराभूत झाल्या आहेत. काँग्रेस पक्षातील महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघात अनपेक्षितपणे काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला आहे.
यासह, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बाळासाहेब पाटील यांचा भाजपाच्या मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर मतदारसंघात पराभव केला आहे.
मुंबईतील माहीम मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सदा सरवणकर यांना चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या महेश सावंत यांनी पराभवाचा धक्का दिला.
याच मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे तिसऱ्या स्थानावर राहिले. तर, उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत.
मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे.