विधानसभेत आघाडीच्या अपयशाची शरद पवारांनी सांगितली तीन मोठी कारणे

Sharad Pawar gave three major reasons for the alliance's failure in the Assembly

 

 

 

विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

 

खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. पण महायुतीने मोठं घवघवीत यश मिळवलं.

 

दुसरीकडे महाविकास आघाडीला फारसं यश मिळवता आलं नाही, उलट आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केला होता.

 

यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं.

 

तसेच आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल लागलेला नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी अभ्यास करणार आहे.

 

तसेच या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीकडून अपप्रचार करण्यात आल्यामुळे त्याचाही काही फटका आम्हाला बसल्याची कारणं शरद पवारांनी सांगितली आहेत.

“आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. सध्या माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे निकालाबाबत काही भाष्य करणं योग्य नाही.

 

निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. असा अनुभव आम्हाला कधी आला नव्हता. आता असा अनुभव आला आहे

 

तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सत्ताधाऱ्यांकडून निवृत्त होण्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “मी काय करावं? ते मी आणि माझे सहकारी ठरवतील. त्यामुळे तो महत्वाचा प्रश्न नाही.

 

आता निकालानंतर जी माहिती आम्ही लोकांकडून आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून घेतो आहोत त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करण्यात आला की

 

ते सत्तेत आले नाहीत तर ही योजना बंद होईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही वर्गाने आमच्या विरोधात जाऊन मतदान केलं”, असं कारण शरद पवारांनी सांगितलं.

“लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची राज्यातील जनतेची भावना होती. त्यामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात विश्वास होता. त्या विश्वासामुळे आम्ही ज्या प्रकारे प्रचार केला.

 

मात्र, त्याही पेक्षा जास्त प्रचार करण्याची गरज होती असं आता वाटतं”, असं महत्वाचं विधान शरद पवार यांनी केलं. तसेच “आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली.

 

मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

 

विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. मात्र, याचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता

 

त्यांनी बटेंगे तो कटेंगेमुळे आम्हाला फटका बसल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला.

 

मात्र, त्या नाऱ्यामुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्याचा निश्चितच फरक पडला”,

 

असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार, प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा महायुतीकडून प्रयत्न, ओबीसीचं मतदान, अशी काही कारणांचा महाविकास आघाडीला फटका बसल्याची कारणं शरद पवारांनी सांगितली आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *