माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशाला व संविधानाला मोठी हानी पोहोचली
Former Chief Justice Chandrachud caused great harm to the country and the Constitution.
जिथे भाजपची सत्ता असते तिथे हिंदू मुस्लीम दंगली होतात आणि सामाजिक सौहार्दता धोक्यात येते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी संविधान आणि देशाला हानी पोहोचवली असेही दवे यांनी म्हटले. सांप्रदायिकता आणि सामाजिक सौहार्दता या विषयावर द वायर या वृत्तसमुहाशी बोलताना दवे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
सध्या त्यांचा व्हि़डिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये जो हिंसाचार झाला, त्यावर दवे यांनी पत्रकारांसोबत व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे चर्चा केली.
त्यावेळी, देशातील परिस्थितीवर भाष्य करताना, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावरही हल्लाबोल केला. तर, शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनीही
या मुद्दयावरुन दवे यांची री ओढत चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे, थेट न्यायपालिकेच्या कार्यभारावरच आता वकील दवे आणि संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दुष्यंत दवे म्हणाले की, सन 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी जी प्रार्थनास्थळं जशी होती तशीच ठेवण्याचा कायदा आहे.
पण, सर्वोच्च न्यायालयात तुम्ही काही शैक्षणिक प्रयोग करत आहात का? धार्मिक सौहार्दतेचा हा गंभीर मुद्दा असल्याचं दवे यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेशच्या संभल येथे उफाळलेल्या धार्मिक हिंसाचारात 4 निष्पाप लोकांचे जीव गेले, त्यासाठी न्यायपालिका जबाबदारी नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
धार्मित हिंसाचारातून दोन समुदाय कायमचे विभागले जात आहेत, लोकांचे जीव जात आहेत ही जखम कधीही भरुन न येणारी आहे. जिथं जिथं भाजपचं राज्य आहे, तिथं तिथं ह्या घटना घडतात.
उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो याठिकाणी अशा घटना घडतात. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशाला व संविधानाला मोठी हानी पोहोचवल्याचा गंभीर आरोपही दवे यांनी केला.
देशात अनेक कामे आहेत, जी आपल्याला करायची आहेत. देशातील 140 कोटी लोकांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला समाजिक शांती प्रस्थापित करायची असून गरिबांना दारिद्र्यातून बाहेर काढायचं आहे, असेही दवे यांनी म्हटलं. यावेळी, दवे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्दयाला दुजोरा देत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केला.
उत्तर प्रदेशमधील संभलचं प्रकरण असेल या बाबतीत प्रार्थनास्थळ कायदा, 1991 च्या माध्यमातून घटनाबाह्य काम करून देश पेटवला आहे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण दिलं आहे.
त्याच घटनाबाह्य सरकारचं काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात उभं आहे. हे काळजीवाहू सरकार देखील संविधानविरोधी आहे.
या सगळ्याला चंद्रचूडच जबाबदार आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही माजी सरन्यायाधीश यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.