अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप

Ajit Pawar group ministers have made serious allegations against former Chief Minister Chavan

 

 

 

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

 

पृथ्वीराज चव्हाण अत्यंत बालिश विधाने करत आहेत. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तुटली त्याला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहे, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

 

 

तटकरे यांच्या या दाव्यावर आता पृथ्वीराज चव्हाण काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्जत येथे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

आमचं सरकार पडलं नसतं तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. चव्हाण यांचा हा दावा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला.

 

 

पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश होतं. ते खोटं बोलतात असं म्हणणार नाही. पण ते चुकीचं बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा काढला तेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती.

 

 

अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. निवडणूकपूर्व आघाडी करण्यासाठी आम्ही चर्चा करत होतो. मी तेव्हा पार्टीचा प्रदेशाध्यक्ष होतो. आघाडीची चर्चा अर्धवट सोडून पृथ्वीराज चव्हाण अर्ज भरण्यासाठी कराडला गेले होते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

 

 

 

ज्या जागांवर राष्ट्रवादीने क्लेम केला तिथे काँग्रेसने त्यांचे उमेदवार घोषित केले होते. त्यानंतर केंद्रीय नेृतृत्वाशी चर्चा करून आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली होती. पृथ्वीराज चव्हाण दावा करतात सरकार पडलं नसतं तर आरक्षण दिलं असतं.

 

 

त्यांचा हा दावा चुकीचा आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज भरले जात होते. आचारसंहिता लागली होती. मग पृथ्वीराज चव्हाण चुकीचं का सांगत आहेत? असा सवाल तटकरे यांनी केला.

 

 

 

पृथ्वीराज चव्हाण आल्यावर सरकारमधील संवाद कमी झाला. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीत जो समन्वय राखला होता, त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी छेद दिला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

 

 

आम्ही एकत्र लढलो असतो तर सरकार आलं असतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण एकत्रित लढण्याची स्थिती कुणामुळे गेली? तर ती काँग्रेसमुळे गेली.

 

 

मी तर असा दावा करेन की, लोकसभेच्या निवडणुकीत पराजय झाल्यावर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा झाली होती, काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार होते.

 

 

राष्ट्रवादीने त्याला संमतही दिली होती. शपथविधीचा दिवसही ठरलेला होता. काँग्रेसचे काही नेते परदेशात होते. ते आल्यावर या निर्णयात बदल झाला.

 

 

तो बदल होऊन निवडणूक झाली असती तर राज्यात आमची सत्ता आली असती. निवडणूकपूर्व आघाडीही झाली असती. या सर्वांना कारणीभूत पृथ्वीराज चव्हाण आहे, असा आरोपच त्यांनी केला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *