अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपद,११ मंत्रीपदे,राज्यपालपद ,केंद्रात मंत्रिपदाची मागणी
Ajit Pawar demands Deputy Chief Minister post, 11 ministerial posts, Governor post, and ministerial post at the Centre

शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही मागणी असल्याची माहिती आहे.
महायुती सरकारच्या शपथविधीला आता अवघे काहीच तास शिल्लक आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार यावर चर्चा रंगलीय.
मात्र राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाबाबत स्ट्राईक रेटवर जोर दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीने कदाचित जास्त जागा लढवल्या असत्या तर आमचे अधिक आमदार निवडून आले असते अशी खदखदही व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात जेवढा वाटा दिला जाईल तेवढाच वाटा हा राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी आता करण्यात येत असल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नाव एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं कळतंय.
तर दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
अजित पवार तातडीनं दिल्लीला पोहोचले असून खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीला समान मंत्रिपदावरील दाव्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अधिक बोलणं टाळलं.. तर भुजबळांनी शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं म्हंटलंय.
महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काहीच तास शिल्लक असूनही मुख्यमंत्र्याचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. अशातच आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे.
या यादीनुसार भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.