पाच मलईदार खात्यासाठी भाजपमध्ये प्रचंड चढाओढ
Huge tussle in BJP for five lucrative portfolios
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला. यानंतर आता सगळ्यांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
अनेक महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे राखणार आहे. ही खाती नेमकी कोणाच्या पदरात पडणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी बरेच आग्रही होते. पण हे खातं त्यांना मिळण्याची शक्यता नाही. गृह मंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम राहू शकतं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ मंत्रालयाची जबाबदारीही तशीच राहू शकते.
महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण या पाच प्रमुख खात्यांसाठी भाजपमध्ये खूप मोठी रस्सीखेच आहे. या पाच खात्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे,
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांच्यात स्पर्धा आहे. सातपैकी पाच जणांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप झाल्यास दोघांना कमी महत्त्वाची खाती मिळतील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर वरिष्ठ मंत्री झाले आहेत. विधानसभेत ते सोमवारी फडणवीस, शिंदे, पवार या तिघांनंतर चौथ्या बाकावर बसलेले होते.
त्यांची ज्येष्ठता पाहता त्यांच्याकडे महसूलचा कार्यभार जाऊ शकतो. मागील मंत्रिमंडळात हे खातं भाजपच्याच विखे पाटलांकडे होतं. त्यामुळे महसूल खातं कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे.
बावनकुळे २०१४ ते २०१९ या कालावधीत ऊर्जा खात्याचे मंत्री होते. ते खातंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे बावनकुळे पुन्हा एकदा ऊर्जावान ठरु शकतात. पंकजा मुंडे २०१४ ते २०१९ दरम्यान ग्रामविकास
आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या. गेल्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंकडे होतं.
आताही हे खातं त्यांच्याचकडे राहण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये ग्रामविकासची जबाबदारी भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे होती. महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं दिलं गेल्यास पंकजा यांना त्यांचं आवडीचं ग्रामविकास खातं मिळू शकतं.