मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

What was Dhananjay Munde's first reaction after resigning from the ministerial post?

 

 

 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड याला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

 

त्याच्यासह इतर सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान, याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात हत्याकांडाचे काही फोटो देखील सादर करण्यात आले आहेत.

 

संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करतानाचे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं व मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तीव्र झाली होती.

 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,

 

“धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.”

 

मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे”.

 

धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की “बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.

 

काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.

 

माझ्या सद्सद विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे.

 

त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे मी राजीनामा दिला आहे.

 

 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवारांनी केवळ दोन वाक्यात यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *