शरद पवार-अमित शाहांची भेट घेणार ,चर्चाना उधाण

Sharad Pawar-Amit Shah will meet, discuss ​

 

 

 

 

राज्यात सध्या शिवसेनेसारखीच गत पवारांच्या राष्ट्रवादीची झाली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभाध्यक्षांसमोर सुरु आहे.

 

 

 

शिवसेनेप्रमाणेच आता पक्ष आणि निवडणूक चिन्हाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असलं तरी त्याविरोधातही शिवसेना ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

 

तरी, या संपूर्ण प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात हे पाहणं महत्वाचं आहे. तरी, या सर्वात एक मोठी घडामोड देशाच्या राजधानीत घडणार आहे.

 

 

ती म्हणजे शरद पवार दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेणार असल्याची बातमी साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

 

 

त्यामुळे जर पवार-शाह भेट झाली तर त्याचे राजकीय परिणाम येत्या काळात महाराष्ट्रात दिसून येणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

 

 

 

 

झालं असं की, कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल बंदीच्या निर्णयामुळे राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार संकटात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुद्द शरद पवारही नाशकात रस्त्यावर उतरलेले दिसले.

 

 

तर, आता इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार साखर कारखानदारांची बाजू मांडण्यासाठी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांना भेटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

 

 

कारण, इथेनॉलबंदीचा मोठा फटका साखर कारखादारांना बसणार आहे. त्यामुळे याविषयी अमित शाहांची भेट घेवून निवेदन देणार असल्याचं कळतंय. तरी, लवकरच पवार-शाह भेटीची शक्यता आहे. याशिवाय, पवार अमित शाहांना पत्र लिहिणार असल्याचं कळतंय.

 

 

 

पण, यात एक गोष्ट सांगायची झाली तर, जर पवार शाहांना भेटत असतील तर, त्यांची फक्त कांदा आणि साखरेच्या मुद्द्यावर चर्चा होणार हे म्हणणं बाळबोध ठरेल. कारण,

 

 

 

सध्या राज्यातलं वातावरण पाहता आणि राष्ट्रवादी-भाजपचा इतिहास पाहता २०१४ साली पवारांनी बाहेरून पाठिंबा देत भाजपला सत्तास्थापनेत मदत केली होती.

 

 

त्यानंतर २०१९ सालीही पहाटेच्या शपथविधीआधीही पवारांनी सत्तास्थापनेबाबत चर्चा केल्याचा दावा खुद्द देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अनेक प्रसंगी बोलून दाखवला आहे.

 

 

 

अशातच, आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्षाची लढाई सुरु आहे. दुसरीकडे येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत.

 

 

त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनंही पवार-शाहांमध्ये चर्चा होऊ शकते. अशातच नवाब मलिकांवरुन सध्या राज्यात तरी फडणवीसांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चाही आहे.

 

 

तर, मलिकांचा आधार घेत पवार अजितदादांची शाहांसमोर कोंडी करु शकतात. त्यामुळे पवार-शाह भेटीनंतर नेमका कुणाचा गेम होणार? हे तर येत्या काळातच कळेल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *