महायुतीत घमासान;विधानसभेत अजितदादांच्या मंत्र्याने केली विदर्भात राष्ट्रवादीला २० जागाची मागणी
Trouble in grand alliance; Ajitdad's minister demands 20 seats for NCP in Vidarbha

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) गडचिरोली-चंद्रपूरमध्ये पाच जागांसह विदर्भात २० जागा मिळाव्या, अशी आग्रही भूमिका अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.
विदर्भातील २० जागा मागताना त्यातील दहा जागांचा सर्वे स्वत: करवून घेतला आहे. अमरावती विभागातील दहा आहेत. महायुतीने जागांचा फॉर्म्युला निश्चित करून कामाला लागल्यास २०० जागा निवडून येतील,
असा दावाही आत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. २० जागांवरील त्यांच्या दाव्यामुळे विदर्भातील जागा वाटपाच्या समीकरणावर
महायुतीत घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना देखील १५ हून अधिक जागांच्या तयारी आहे तर, भाजपचा सर्वाधिक भर विदर्भावर आहे.
लोकसभा व विधानसभा निवडून लढण्याच्या पद्धतीत बराच फरक आहे. विदर्भात २० जागांची आमची मागणी आहे. कुणामुळे जागा कमी आल्या,
यावर चर्चा करण्याऐवजी, अधिक जागा कशा निवडून येतील, यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. विधान परिषदेवर गडचिरोली जिल्ह्यातून एक आदिवासी प्रतिनिधी पाठवल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल, असेही ते म्हणाले.
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदियाची जागा महायुतीने गमावली. त्यामुळे त्यांच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे, याचा इन्कार करून धर्मरावबाबा आत्राम म्हणाले,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ६ महिन्यापूर्वीच पालकमंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. गडचिरोली जिल्ह्यात
अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी या पदावरून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. त्यांनी ही मान्य केली, यात नाराजी किंवा पद सोडण्याचा प्रश्नच नाही.
छगन भुजबळ आमचे नेते आहेत. गडचिरोली मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मी निश्चित निवडून आलो असतो.
आता हा विषय संपला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा वर्षभरापासून ऐकत आहोत. जेव्हाही होईल, तेव्हा सर्वांना कळेल, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.