हरियाणातील पराभवावरून राहुल गांधी संतप्त ,म्हणाले…..

Rahul Gandhi angry over the defeat in Haryana, said...

 

 

 

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. भाजपाने ९० पैकी ४९ जागा जिंकत बहुमताचा टप्पा पार केला आहे.

 

तर, काँग्रेसला राज्यात मोठा फटका बसला आहे. काँग्रेसने राज्यात ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.

 

दरम्यान, हरियाणामधील या पराभवानंतर काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसची चिंतन बैठक बोलावली होती.

 

या बैठकीत राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक हितांना प्राधान्य दिल्यामुळे आपल्याला हा पराभव पाहावा लागला आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

 

या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान, भूपेंद्रसिंह हुड्डा, काँग्रेसचे हरियाणा प्रभारी दीपक बाबरिया,

 

हरियाणा पर्यवेक्षक अशोक गहलोत उपस्थित होते. या बैठकीत बराच वेळ चर्चा झाली, मात्र बैठकीतून काहीच साध्य झालं नाही.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने या पराभवानंतर चिंतन समिती गठित केली आहे जी राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण करेल व आगामी निवडणुकांची तयारी करेल.

 

हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राहुल गांधींनी तिखट प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, “राज्यातील नेत्यांनी स्वतःच्या गोष्टींना अधिक प्राधान्य दिलं.

 

त्यामुळे पक्ष मागे पडला. या लोकांनी पक्षाच्या हिताला बगल देत वैयक्तिक फायदे मिळवण्याला प्राधान्य दिलं”. या बैठकीत राहुल गांधी यांनी स्थानिक नेते आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांवरील नाराजी जाहीर केली.

 

काँग्रेसची ही बैठक फार वेळ चालली नाही. अर्ध्या तासांत ही बैठक पूर्ण झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले, “पराभवाच्या कारणांवर आम्ही चर्चा केली”.

 

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा व कुमारी शैलजा यांच्यातील मतभेदांवर प्रतिक्रिया विचारली असता अजय माकन म्हणाले, “पराभवाची वेगवेगळी कारणं आहेत.

 

केवळ निवडणूक आयोगापासून नेत्यांमधील मतभेदांपर्यंत मर्यादित नाहीत. पराभवाच्या वेगवेगळ्या कारणांवर साधकबाधक चर्चा झाली. पुढेही आम्ही ही चर्चा करू”.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *