मंत्र्यांचे सूचक विधान ‘शरद पवार-सुप्रिया सुळे शांत म्हणजे वादळ येणार’
Minister's suggestive statement 'Sharad Pawar-Supriya Sule's calm means a storm will come'
मागील तीन वर्षात महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष फुटले आहेत. सुरुवातीला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा एक गट भाजपबरोबर गेला. त्यानंतर अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुतीत सामील झाला.
आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. प्रत्येक पक्षाने स्वतंत्र्यपणे आपल्या पक्षाची उभारणी केली आहे. असं असताना शरद पवार गटाला पुन्हा एकदा खिंडार पडू शकते, याबाबतचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत.
शरद पवार गटात वादळापूर्वीची शांतता असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार काहीच बोलत नाहीयेत. सुप्रिया सुळेही कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाहीत.
त्यांचे इतर प्रवक्ते देखील शांत आहेत. याचा अर्थ समजून घ्या, असं सांगत शिरसाट यांनी शरद पवार गट फुटीचे संकेत दिले आहेत.
अधिवेशन पूर्ण होण्याआधी किंवा अधिवेशनानंतर शरद पवार गट फुटेल असंही ते म्हणाले. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
महाविकास आघाडीतील गोंधळावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “महाविकास आघाडी आता राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांना पाडण्याचं काम केलं.
त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचं तोंडही पाहायला तयार नाहीत. आता नाना पटोले उद्धव ठाकरेंना भेटायला तयार नाहीत.
ना उद्धव ठाकरे नाना पटोलेंना भेटायला तयार आहेत. सगळ्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. शरद पवार काय निर्णय घेतील, हे अधिवेशनात किंवा अधिवेशन झाल्यानंतर लवकरच कळेल.”
“शरद पवार हे कधी काय निर्णय घेतील कुणालाही सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार कुठेही दिसत नाहीत. सुप्रिया सुळे कोणत्याही मुद्यावर बोलताना दिसत नाहीत.
त्यांचे प्रवक्तेही काही बोलताना दिसत नाहीत. कुणीही बोलताना दिसत नाही, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हे सगळेजण शांत असतील तर समजायचं एक वादळ निर्माण होणार आहे. वादळाचा काहीही अर्थ नसतो, वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करत असतं,” असंही शिरसाट म्हणाले.