मनोज जरांगे उद्या परभणीत ,तर 28 डिसेंबर रोजी बीडमधील मोर्चात होणार सामील
Manoj Jarange will be in Parbhani tomorrow and will join the march in Beed on December 28.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यभरात संताप व्यक्त होत असून राजकीय वातावरणही तापलं आहे. बीडमधील नेतेमंडळी व नव्याने मंत्री झालेले मुंडे गप्प का आहेत,
असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा व बीडमधील सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून 28 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी करत जनता रस्त्यावर उतरणार आहे.
मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती.
आता, पुन्हा एकदा ते मस्साजोगला जाणार आहेत. बीड जिल्ह्यात 28 तारखेला जनतेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातही ते सहभागी होणार असून
बीड जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे, आता 28 डिसेंबरच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
कोणाचाही पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही, कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का? एकदा बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल? अशा शब्दात त्यांनी सरकारलाही इशारा दिला.
संतोष भैया देशमुखचं मृत्यूप्रकरण कोणाचा बाप आला तरी मी दबू देणार नाही. त्यासाठी, 28 तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 25 जानेवारीला आंतरवाली मधील सामूहीक उपोषणासाठी
राज्यभरातील गावागावातील मराठा समाज बैठक घेत आहे. तसेच, उद्या परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी कुटुंबाची भेट घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.