मस्साजोग प्रकरणावरून मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना गर्भित इशारा
Manoj Jarange's implicit warning to Chief Minister Fadnavis over the Massajog case

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अद्यापही पकडण्यात आलं नसल्याने त्याचा निषेध म्हणून आज बीडमध्ये विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मोर्चाच्या निमित्ताने संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे. तसेच गावातील एकूण एक व्यक्ती मोर्चात सहभागी होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असून मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे. आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांना पाठी घालू नका, पश्चात्ताप होईल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. इतके दिवस झाले आरोपीला पकडले जात नाही. आरोपीला वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत.
खरंतर आरोपींना वाचवणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आरोपी हजर झाले पाहिजे. नाही तर तुझी खैर नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे.
पण मुख्यमंत्री तसं करत नाही. संतोष देशमुख यांचा खून झाला. त्याचं कुणाला काही पडलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा खून झाला असता तर तुम्हाला झोप लागली असती का?
मग तुम्हाला देशमुख यांच्या पत्नीचा भयंकर आक्रोश ऐकू का येत नाही? असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या लेकीचा आक्रोश आहे. आईचा आक्रोश आहे. तुम्हाला हा आक्रोश दिसत नाही का? तुम्ही आरोपींना पकडत नाही. वातावरण थंड होण्याची वाट पाहात आहात.
तुम्हीच आरोपींना पकडून ठेवलं की काय असं वाटत आहे. पण आम्ही वातावरण थंड होऊ देणार नाही. हे वातावरण आता राज्यभर पसरेल. प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही मोर्चे काढणार आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगतिलं.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेले आहे. त्यांनी हे प्रकरण तापत ठेवण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे काढा, अशी हाक त्यांनी मराठा समाजाला दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मोर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि जनतेने आणि सगळे मराठ्यांना विनंती आहे एकाने पण घरी थांबू नये,
असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर, आम्ही त्यांना जाग आणणार. कुणाच्या पण बापाला येऊ द्या, हे मॅटर मात्र मी दाबू देणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी, महायुती असं राजकारण करणार्यांवर आसूड ओढला. ते जसे एकमेकांचे राजकारण काढत आहे. त्याच्या विरोधात समाज जाईल. यात राजकारण करू नये,
मग महायुती किंवा महविकास आघाडी यांनी राजकारण करू नये. लाज वाटू द्या. महाविकास आघाडी असो की महायुतीमुळेचे हाल होऊ लागले आहेत असा आरोप त्यांनी केला.
काही मंत्री आहेत काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करा. संतोष देशमुख यांचा खून झालाय, याच राजकारण कोणीही करू नका, मोर्चात सत्ताधारी आणि
विरोधक दोन्ही सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात हलगर्जी पणा नाही केला पाहिजे, जातीयवाद पसरेल असं काम करू नका, जातीयवाद कसा नष्ट होईल यासाठी काम करा, असे ते म्हणाले.
आज बीडचा मोर्चा शांततेत होणार, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चे काढा. मोर्चाची एक तारीख होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जरांगे यांनी केले.
जर सरकारने आरोपींना नाही धरलं तर मराठे तपास हातात घेणार. तुम्ही नुसतं म्हणतात आम्ही आरोपीला सोडणार नाही, अरे आरोपीला धरणार केव्हा? असा सवाल त्यांनी केला. हा मोर्चा जनतेचा आहे, कोणाच्या नेतृत्वात नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री तुम्ही तोंडघशी पडणार, तुम्ही ज्यांना वाचवतात त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल. मुख्यमंत्री मराठे तुमच्या विरोधात जातील. मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत,
आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करत आहेत. मी कोणतंच मॅटर दाबू देणार नाही. तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का? आम्ही तुमची गुंडगिरी मोडून काढू शकतो. मुख्यमंत्री तुम्ही ॲक्शन मोडवर या, असे आवाहन त्यांनी केले.
बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. काही लोक बंदूका बाळगत आहेत. बंदुकीच्या जोरावर शिवीगाळ करत आहेत. जमिनी बळकावत आहेत.
त्यांचा बिमोड करणं हे तुमचं काम आहे. पण तुम्हीच त्यांना सांभाळताना दिसत आहात. मुख्यमंत्र्यांनी या लोकांना सांभाळू नका. साहेब, तुम्ही या लोकांना सांभाळू नका. पाठिशी घालू नका.
नाही तर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. हेच लोक एक दिवस वर टांग करतील. तेव्हा या लोकांना तेव्हाच संपवलं असतं तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल, असंही त्यांनी म्हटलं.