छगन भुजबळांच धक्कादायक विधान “मला गोळी मारली जाऊ शकते”
Chhagan Bhujbal's Shocking Statement “I Can Be Shot”
मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आज ( १२ डिसेंबर ) विधानसभेत छगन भुजबळांनी मोठा दावा केला आहे.
मला गोळी मारली जाऊ शकते, असा दावा भुजबळांनी पोलिसांच्या अहवालाचा दाखला देत केला आहे. यावरून जरांगे-पाटलांनी भुजबळांना लक्ष्य केलं आहे.
“माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरे जाळण्यात आली. कुणी बीडला जायला तयार नाही. आमचं सुद्धा हेच होईल. कुणी यावं अशी अपेक्षा नाही.
माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबद्दल पोलिसांनी सांगितलं की, ‘तुम्हाला गोळी मारली जाईल,’ असा अहवाल आलाय. मारा… हरकत नाही… मरायला मी तयार आहे.
मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. पण, ही झुंडशाही थांबवा,” असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.
भुजबळांच्या विधानावर जरांगे-पाटलांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “छगन भुजबळ काहीही वक्तव्य करत आहेत.
माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगून गुन्ह्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न भुजबळांकडून केला जातोय. हेच देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. सरकारही भुजबळांना घाबरत आहे.”
“भुजबळ मंत्री असून त्यांनी चांगलं बोलावं. मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नये. आम्ही ओबीसी बांधवांबद्दल एक शब्द तरी काढतो का? भुजबळांवर मी आयुष्यभर बोलणार.. त्यांना सुट्टीच नाही,”
असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.“छगन भुजबळ बधिर झाले आहे. त्यांचं वय झाल्यानं काहीही बोलत आहेत. त्यांना काहीही कळत नाही,” असं टीकास्रही जरांगे-पाटलांनी डागलं आहे.