धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी साडेतीन कोटींची जमीन हडपल्याचा आरोप
Dhananjay Munde and Pankaja Munde accused of grabbing land worth Rs 3.5 crore

महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे.
तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे असाही आरोप होतो आहे. या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे.
दरम्यान दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक करडा यांनी आपली जमीन लाटली असा आरोप केला आहे.
“मी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. आज मी अजित पवार यांनाही भेटले आहे. माझी जमीन धनंजय (धनंजय मुंडे) आणि त्याच्या माणसांनी हडप केली आहे.
गोविंद मुंडे हा त्याच्या घरचा नोकर आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली. कोऱ्या कागदांवर, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर सह्या घेतल्या
आणि त्या देत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला. त्यामुळे आम्ही विचार केला की एवढं जमिनीत काय? की आमची जमीन हडप केली.” असा प्रश्न सारंगी महाजन यांनी विचारला आहे.
सारंगी महाजन पुढे म्हणाल्या, “प्रवीण महाजन यांना जाऊन १० वर्षांहून अधिक काळ होऊन गेला. मी कधीही यांच्याकडे (धनंजय मुंडे, पंकजा मुंडे ) आलेले नाही. यांचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण यांना लखलाभ आम्ही आमच्या पद्धतीने राहात होतो. तरीही आमची जमीन हडप केली.
या प्रकरणात पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे. जमीन हडप करण्याचं प्रकरण ६ जून २०२२ चं आहे. आम्हाला इस्सार पावती पाठवण्यात आली. मला सुरुवातीला काही सांगितलं नव्हतं.
मी जमिनीचा व्यवहार केला असं खोटं लिहिलं आहे. आज न्याय मागण्यासाठी मी अजित पवारांकडे गेले होते, आता देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मी आंबेजोगाई जिल्हा न्यायालयात ही केसही मी दाखल केली आहे.” असंही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत.
साडेतीन कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली जमीन २१ लाख रुपयांना दिली. त्याचे पैसे आल्यानंतर मला समजलं की हा सगळा घोटाळा आहे. माझी जमीन मला दाखवलीच नाही.
१५ दिवसांनी जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याचा सातबारा बदलून टाकला होता. जो नियमाने १५ दिवसांनी बदलतो. सात बारा कागदावर इतर नावंही चढवली होती. ज्यांना जमीन विकली ते लोकही मला ठाऊक नव्हते असंही सारंगी महाजन म्हणाले.
माझी जमीन गोविंद मुंडे, दशरथ चाटे आणि पल्लवी गीते यांच्या नावे करण्यात आली आहे. पल्लवी गीते ही गोविंद या धनंजयच्या नोकराची सून आहे. गोविंद मुंडे धनंजय मुंडेंच्या घरचा नोकर आहे.
त्याच्या पत्नीला नगरसेवक करण्यात आलं. आता त्याच्याकडे चार गाड्या, बंगला आणि स्टोन क्रशरचा व्यवसाय असं सगळं उभं केलं आहे असाही आरोप सारंगी महाजन यांनी केला.
एवढी माया गोविंद मुंडेने जमा केली आहे. आमच्याकडेही इतकं नाही. मी धनंजयकडे दीड वर्षे विचारणा केली. मामीला मदत कर हे सांगितलं. तो मधे आहे की नाही हे मला माहीत नाही.
मग तो टाळाटाळ करु लागला. मला म्हणाला मामी तू परस्पर जमीन विकली, माझ्याकडे यायला पाहिजे होतं. नंतर म्हणाला की मामी फॉलो अप कमी पडला.
धनंजय मी परळीत गेले की बाहेर निघून जायचा. मला भेट नाकारायचा. त्यामुळे मला हे सगळं लक्षात आलं. धनंजयचा अपघात झाला होता त्याला मी रुग्णालयात भेटायला गेले होते.
त्यावेळी मला म्हणाला होता की मी परळीचा किंग आहे मामी, तुला तुझी जमीन मिळवून देतो. परळीत कुठलीही जमीन विकली तर मला कळतं. माझ्याशिवाय कुणाचीही जमीन विकली जात नाही.
पण मी आशा धरली होती की धनंजय मदत करेल. तीन वर्षे संपण्यासाठी तो वाट बघत होता. मी चोराकडेच दाद मागत होते हे मला कळलं. त्यामुळे संभाजी नगरचे वकील घेऊन कोर्टात केस टाकली आहे.
वाल्मिक कराड आणि माझी भेट नाही. कारण वाल्मिकचा हात यात असू शकतो. वाल्मिक कराडचाही या प्रकरणात हात असू शकतो. मला धाक दाखवण्यात आला की परळीत आला तर पंकजा आणि धनंजयला समजलं.
गोविंदने मला सांगितलं की पंकजाने तिथे झोपडी बांधली आहे एक जोडपं ठेवलं आहे, गायी गुरं ठेवली आहेत. ती जमीन तुम्हाला मिळणार नाही असंही सारंगी महाजन म्हणाल्या. सारंगी महाजन यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत.
पंकजाला मी भेटले नाही कारण हा सत्तेत होता, तिला भेटून काही फायदा नव्हता. मी भेटणार होते पण मी भेटले नाही. अजित पवारांनी मला खात्री दिली आहे की
प्रकरण मार्गी लावून देतो. धनंजयने परळीची अवस्था बिहारपेक्षा वाईट करुन ठेवली आहे. धनंजयने नातेवाईकांना सोडलं नाही तर लोकांना किती त्रास दिला असेल?
तुम्ही विचार करा असंही सारंगी महाजन म्हणाल्या. बीडचे लोक त्रासले आहेत. याला मत दिलं नाही तर हा आमची जमीन लाटतो असंही मला अनेकांनी सांगितल्याचं सारंगी महाजन म्हणाल्या.