आदित्य ठाकरेंची खासदारांसोबत 1 तास चर्चा

Aditya Thackeray's 1-hour discussion with MPs

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि डिनर डिप्लोमसीची जोरदार चर्चा सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व पक्षाचे खासदार हे सध्या दिल्लीत आहेत.

 

दिल्लीत संसदेची कामे पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी डिनर डिप्लोमसीचे कार्यक्रम पार पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे याच डिनर डिप्लोमसीच्या निमित्तातून शिवसेनेच्या खासदारांकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या घटनांचा धसका घेतल्याची चर्चा आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत खासदारांसोबत घेतलेली 1 तास बैठक हे त्याचंच उदाहरण आहे, अशी देखील चर्चा आहे.

 

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

त्यानंतर शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीदेखील स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे तब्बल तीन खासदार गेले. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावली.

 

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांनी हजेरी लावलेली होती. याबाबत चर्चांना उधाण आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसोबत दिल्लीत बैठक घेतली.

 

आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

 

तसेच त्यांनी इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांचीदेखील भेट घेतली. एकीकडे आदित्य ठाकरे हे दिल्लीत आलेले असताना त्यांच्याच पक्षाचे खासदार हे दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

 

याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांसोबत बैठक घेतली आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या.

 

खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची सर्व खासदारांसोबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 1 तास चालली. या बैठकीला फक्त दोन खासदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे.

 

खासदार अनिल देसाई आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी उपस्थित नव्हते. इतर सर्व खासदार या बैठकीत उपस्थित होते. यामध्ये राज्यसभेचे दोन खासदार आणि लोकसभेच्या 8 खासदारांचा समावेश होता.

 

यावेळी सर्वांची एकी कायम ठेवा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांना दिला. आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी दिली. स्नेहभोजनाला जाण्याआधी एकदा एकमेकांना विचारुन घ्या, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *