उमेदवारीसाठी “नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
"Neelam Gorhe took money for candidacy," Thackeray group leader makes sensational claim

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असं वक्तव्य मराठी साहित्य संमेलनात केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे अडचणीत सापडल्या आहेत.
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी कशाप्रकारे कार्यकर्त्यांची लूटमार केली,
याविषयी विनायक पांडे आणि अशोक हरनावळ यांना विचारा, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनीही नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली.
“मी शिवसेनेचा सात वर्षे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपमहापौर, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पदासाठी माझ्याकडून एक रुपयाही मागितला नाही.
फक्त त्यांनी माझं काम पाहून मला पदं दिली. शिवसेनेने मला जे दिलं ते भरभरून दिलं. पण नक्की सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीत या बाईने माझ्याकडून पैसे घेतले होते.
राज्यात अनेक कार्यकर्ते पुढे येऊन सांगतील की या बाईंनी काय काय केलं आहे”, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मुळात त्यांनी जो विषय दिल्लीत मांडला, तो मांडण्याचा व्यासपीठ ते नव्हतं. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती.
त्यामुळे आम्हाला या बाईची किव येते. मी ४३ वर्षे शिवसेनेत आहे. मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. पण काही नवीन कार्यकर्ते आहेत, ज्यांना पदाची अपेक्षा असते,
त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्क प्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही”, असाही आरोप विनायक पांडे यांनी केला.
“मी मध्य नाशिकमधून इच्छूक होतो. अजय बोरास्ते इच्छूक होते. त्यावेळी नीलम गोऱ्हेंचा कार्यकर्ता माझ्याकडे आला. त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी चर्चा करून दिली. माझी पार्श्वभूमी सांगितली.
ताईंनी सांगितलं की तिकिटाकरता इतके इतके मला द्यावे लागतील. त्यातील काही पैसे मी त्यांना पोहोचवले. पण तरीही अजय बोरास्ते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी माझे पैसे मागितले.
पण त्यांनी आज-उद्या देतो करत चालढकल केली. शेवटी मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन मी माध्यमांना माहिती देईन. तेव्हा त्यांनी आमदार निवास येथे काही रक्कम दिली. त्यातही कमी रक्कम दिली”, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी काल शिवसेना ठाकरे गटावर कलेल्या आरोपानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची
आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षांना खुश करुन राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील, तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र, त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याचे अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि
मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहे असं अंधारे म्हणाल्या.
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे.
मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावरुन आता विविध प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.