भाजपचा प्लॅन ओळखून आता शिंदेंची नवी खेळी ,शिवसेनेच्या ११ संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर
Shinde's new move after recognizing BJP's plan, list of 11 Shiv Sena liaison ministers announced

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक राजकारणाला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर दिल्याची चर्चा आहे.
जानेवारीमध्ये पालकमंत्र्यांची घोषणा झाली. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपनं संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली.
सेना, राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठीच भाजपनं संपर्क मंत्री जाहीर केले. भाजप मित्रपक्षांवर कुरघोडी करुन जिल्ह्यांमध्ये आपली समांतर निर्माण करत असल्याची चर्चा त्यावेळी झाली. भाजपनं केलेल्या या खेळीला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सेनेच्या ११ मंत्र्यांकडे एकूण २३ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
या २३ जिल्ह्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. मंत्री उदय सामंत, संजय राठोड यांच्याकडे प्रत्येकी तीन जिल्ह्यांचं संपर्क मंत्रिपद आहे. तर ८ मंत्र्यांकडे प्रत्येकी २ जिल्हे देण्यात आले आहेत. योगेश कदम यांच्याकडे १ जिल्हा देण्यात आला आहे.
भाजपनं ५ फेब्रुवारीला संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्या घोषणेला महिना होत असताना आता शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांकडे मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचं संपर्क मंत्रिपद दिलं आहे.
त्यामुळे शिंदे भाजपला त्यांच्याच रणनीतीनं प्रत्युत्तर देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, बीडचं पालकमंत्रिपद आहे. शिंदेंनी पुण्याचं संपर्क मंत्रिपद उदय सामंत यांच्याकडे, तर बीडचं संपर्क मंत्रिपद संजय शिरसाट यांच्याकडे दिलं आहे.
जिल्हे, पालकमंत्री, त्यांचे पक्ष आणि शिंदेसेनेचे संपर्कमंत्री खालीलप्रमाणे-
परभणी- मेघना बोर्डीकर (भाजप), गुलाबराव पाटील (शिवसेना)
बुलढाणा – मकरंद जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), गुलाबराव पाटील (शिवसेना)
मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री), उदय सामंत (शिवसेना)
पुणे – अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), उदय सामंत (शिवसेना)
सिंधुदुर्ग – नितेश राणे (भाजप), उदय सामंत (शिवसेना)
सांगली – चंद्रकांत पाटील (भाजप), शंभुराज देसाई (शिवसेना)
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप), शंभुराज देसाई (शिवसेना)
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप), संजय राठोड (शिवसेना)
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप), संजय राठोड (शिवसेना)
चंद्रपूर – अशोक उईके (भाजप), संजय राठोड (शिवसेना)
धुळे – जयकुमार रावल (भाजप), दादा भुसे (शिवसेना)
नंदुरबार – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), दादा भुसे (शिवसेना)
पालघर – गणेश नाईक (भाजप), प्रताप सरनाईक (शिवसेना)
सोलापूर – जयकुमार गोरे (भाजप), प्रताप सरनाईक (शिवसेना)
हिंगोली – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), भरत गोगावले (शिवसेना)
वाशिम – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), भरत गोगावले (शिवसेना)
बीड – अजित पवार (राष्ट्रवादी), संजय शिरसाट (शिवसेना)
नांदेड – अतुल सावे (भाजप), संजय शिरसाट (शिवसेना)
अकोला – आकाश फुंडकर (भाजप), प्रकाश आबिटकर (लातूर)
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले (भाजप), प्रकाश आबिटकर (लातूर)
भंडारा – संजय सावकारे (भाजप), आशिष जैस्वाल (शिवसेना)
गोंदिया – बाबासाहेब पाटील (भाजप), आशिष जैस्वाल (शिवसेना)
जालना – पंकजा मुंडे (भाजप), योगेश कदम (शिवसेना)