गावाकडे येण्याबाबत एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
Eknath Shinde made a big disclosure for the first time about coming to the village.

येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव इथे गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? ते नाराज आहेत का? असा सवाल सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे.
मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील.
मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून काम केलं.
मी देखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे लोकही या सरकारला आपलं लाडकं सरकार म्हणतात.
महाविकास आघाडीने जे प्रकल्प रखडवले होते, त्याला आम्ही चालना दिली, लोकांनी देखील आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यातील राजकारणाचे केंद्र दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगाव झाले आहे. एकनाथ शिंदे दरेगावमध्ये असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा टोला लगावला.
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले.
जनतेचे प्रश्न सोडवले. अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या.
सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते. आम्हाला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर कोणताही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली.
त्यात माझी सर्व भूमिका स्पष्ट केली. मी माझा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेणार आहे.
तुम्हाला गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदपद हवे आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबत महायुतीत चर्चा होईल. त्यातून निर्णय होतील. जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
आम्हाला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे विरोधक काय बोलताय? त्याकडे मी लक्ष देत नाही. मला माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळत नाही. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या चर्चा करत आहेत.
निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या साताऱ्यातील मुळगावी दरेगावात आहेत. ते आज दुपारी दोन वाजता दरेगावातून ठाण्यासाठी रवाना होणार होते.
मात्र त्यांनी साताऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा ते आपल्या मुळगावी परतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांचा ताफा देखील मागे बोलावण्यात आला आहे.
दरम्यान आता एकनाथ शिंदे हे साडेतीन वाजता ठाण्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपद आणि महसूल मंत्रिपदासाठी अग्रही आहेत. मात्र दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 जागा महायुतीने जिंकल्या, 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान बहुमत मिळून देखील अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेंन्स कायम आहे.
येत्या पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अग्रही आहेत,
जर गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे. जर शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळालं नाही तर शिवसेना शिंदे गटातील दुसरा एखादा ज्येष्ठ नेता उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच ते आपल्या साताऱ्यातील मुळगावी दरेगाव इथे गेल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं,
मात्र भाजपकडून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. शिंदे बिलकूल नाराज नाहीत, या बातम्या केवळ प्रसारमाध्यमांमधून चालवल्या जात आहेत.
ते जर आपल्या मुळगावी गेले असतील तर त्यात शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.