डोनाल्ड ट्रम्प गरम झाले ;म्हणाले भारताने केली अमेरिकेची लूट
Donald Trump got heated; said India looted America

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी म्हणाले की, भारत आमच्याकडून खूप जास्त आयातशुल्क वसूल करतो. इतके की तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाहीत.
आता भारताचा कुणीतरी भांडाफोड केल्यामुळे त्यांनी आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेशी व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयातशुल्क कमी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर काही तासांत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला.
तेव्हाच त्यांनी दोन्ही देशांना लाभ होईल असा द्वीपक्षीय व्यापार करार करत त्यावर वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली होती.
वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेत होते. अमेरिकेतील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील द्वीपक्षीय व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे.
व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, आमच्या देशाला प्रत्येकाने लुटले आहे. आम्ही ही लूट थांबवली आहे.
माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी यावर काही प्रमाणात निर्बंध आणले होते. अमेरिकेला आर्थिक, वित्तीय आणि व्यापारी दृष्टीकोनातून जगातील अनेक देशांनी लुटले आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात ही लूट थांबविण्याचा मी प्रयत्न करत आहे.
तत्पूर्वी ५ मार्च रोजी अमेरिकेच्या संयुक्त अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातशुल्क वाढीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले की, भारता आमच्याकडून अधिक आयातशुल्क वसूल करत आहे, तर मग आम्हीही आयातशुल्क वाढवू.
शुक्रवारी माध्यमांशी बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी ते रशियावर बँकिंग निर्बंध आणि आयातशुल्क लावण्याचा गंभीरतेने विचार करत आहेत. ट्रुथ या सोशल मीडियावरील अकाऊंटवर एक पोस्ट टाकून ट्रम्प यांनी याबाबतचे सुतोवाच दिले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये बाचाबाची झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियाकडे वक्रदृष्टी फिरवली आहे.
युक्रेन विरोधात चाललेले युद्ध थांबवून शांतता करार अस्तित्त्वात येईपर्यंत रशियावर बँकिंग निर्बंध आणि आयातशुल्क लादण्याचा विचार अमेरिकेकडून केला जात आहे.
याबाबतचे सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केले. काही दिवसांपूर्वीच रशियाशी पुन्हा एकदा संबंध निर्माण करण्यासाठी त्यांच्यावरील निर्बंधामध्ये सवलत दिली जाईल,
असा विचार अमेरिकेकडून केला जात होता. मात्र आता काही दिवसांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी भूमिका मांडली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले, “वास्तविकता पाहिली तर रशियाने युक्रेनला युद्धात चांगलीच धूळ चारली आहे.
त्यामुळे जोपर्यंत युद्धबंदी करून शांतता करार केला जात नाही, तोपर्यंत रशियावर मी मोठ्या प्रमाणात बँकिंग निर्बंध आणि आयातशुल्क लादण्याचा गंभीरतेने विचार करत आहे. उशीर होण्याआधी रशिया आणि युक्रेनने एकाच मंचावर येऊन एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे. धन्यवाद!!!”
मागच्या आठवड्यात झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना खडेबोल सुनावले.
यामुळे झेलेन्स्की जेवण सोडून व्हाईट हाऊसमधून तडक निघून गेले. यामुळे युक्रेन-रशिया युद्धाचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच रशियानेही या बाचाबाचीवर झेलेन्स्की यांना टोला लगावला होता.
युक्रेन-रशिया मधील युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. युद्धावर लवकर तोडगा काढला जावा, असे ते अनेकदा बोलले आहेत.
तर झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे की, घाईघाईत युद्धबंदी केल्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पुन्हा युद्धाला तोंड फोडू शकतात. व्हाईट हाऊसमध्ये याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना झेलेन्स्की यांनी काळजी व्यक्त केली. ज्यावर ट्रम्प चांगलेच संतापलेले दिसले.