सहा महिन्यात मोठा राजकीय भूकंप ;सुप्रिया सुळेंच्या विधानाने खळबळ
Big political earthquake in six months; Supriya Sule's statement creates a stir

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यामध्ये पुढील सहा महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल,
असं सूचक विधान केलं आहे. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. धनंजय मुंडे पक्षात असतानाही माझी लढाई सुरु होती, असं नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून देखील टीकास्त्र सोडलं.
‘बरं झालं पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणं शक्य नाही’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली आहे.
राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना ‘शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे,’ असा गौप्यस्फोट देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.
मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यांची हे गम्मत बघत होते, किती ही विकृती आहे.
हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यावयाची, खंडणीही यांची गोळा करायची, या हक्काचा अक्का तोच आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी घणाघात केला.
राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर टीका करताना सुळे म्हणाल्या, मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे.
सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो.
हिम्मत असेल, तर समोर येऊ लढ. ही लाढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.