दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात सापडले कोट्यवधींचे घबाड

Crores of rupees found in Delhi High Court Justice Yashwant Verma's bungalow

 

 

 

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात घबाड सापडले. त्यांच्या बंगल्याला आग लागल्याचे निमित्त झाले आणि हा प्रकार समोर आला.

 

त्यांच्या बंगल्याला लागलेली आग विझवण्यात आल्यानंतर मोठी रक्कम सापडली. त्यामुळे न्याय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे.

 

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील कॉलेजियमने लागलीच कारवाई करत, संबंधित न्यायमूर्तींची बदली केली आहे. त्यांची रवानगी अलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा वर्मा हे शहरात नव्हते.

 

बंगल्याला आग लागताच वर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचरण केले. आग विझवल्यानंतर एका खोलीत मोठी रक्कम सापडली. सगळीकडे नोटाच नोटा पडल्याचे दिसून आले.

 

कोट्यवधी रुपयांची ही रक्कम पाहून सगळेच चक्रावले. त्यानंतर कोर्टातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची नोंद केली. तर आता याप्रकरणात ईडी आणि सीबीआयच्या एंट्रीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या काही सदस्यांनी ही गंभीर घटना असल्याने केवळ बदली करून भागणार नाही, असे मत नोंदवल्याचे समोर येत आहे.

 

वर्मा यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे त्यांना सुचवण्यात आल्याचे कळते. जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली नाही तर त्यांच्यावर इन हाऊस इन्कायरी होऊ शकते. त्यानंतर पुढील कारवाई होईल.

 

न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे दिल्ली हायकोर्टात कार्यरत होते. त्यांची आता अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे.

 

त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. अलाहाबाद हायकोर्टातच त्यांनी वकिली केली. पुढे 13 ऑक्टोबर, 2021 रोजी त्यांची न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्यात आली.

 

 

त्यांची पहिली नियुक्ती ही दिल्ली उच्च न्यायालयातच झाली. त्यांनी आतापर्यंत ठोस आणि कायद्याच्या आधारावर दिलेल्या निकालाची वकिलांच्या वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

 

 

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा जन्म 6 जानेवारी 1969 रोजी अलाहाबाद येथे झाला. दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून त्यांनी बीकॉम ऑनर्सची पदवी मिळवली.

 

यशवंत वर्मा यांनी 1992 मध्ये रेवा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांची 08 ऑगस्ट 1992 रोजी वकील म्हणून नोंदणी झाली. अधिवक्ता यशवंत वर्मा प्रामुख्याने घटनात्मक,

 

औद्योगिक विवाद, कॉर्पोरेट, कर आकारणी, पर्यावरण आणि कायद्याच्या संबंधित शाखांशी संबंधित विविध प्रकरणे हाताळणारे दिवाणी खटले चालवतात. 2006 पासून त्यांच्या पदोन्नतीपर्यंत न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विशेष वकील देखील होते.

 

यशवंत वर्मा हे 2012 ते ऑगस्ट 2013 पर्यंत उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य स्थायी वकील होते. यानंतर त्यांना न्यायालयाने ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. 13 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती झाली. त्यांनी 01 फेब्रुवारी 2016 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 11 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली.

 

दरम्यान, आज राज्यसभेत काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि न्यायालयीन जबाबदारीवर चर्चा करण्याची मागणी केली.

 

यावर प्रतिक्रिया देताना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे आणि ते या विषयावर चर्चा करणार आहेत.

 

जयराम रमेश म्हणाले की, आज सकाळी आम्ही एक धक्कादायक बातमी वाचली ज्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली.

 

यापूर्वी 50 खासदारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची नोटीस दिली होती, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, याची आठवणही रमेश यांनी करून दिली.

 

दुसरीकडे, कॉलेजियमच्या काही सदस्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी सूचना केली. त्यांनी नकार दिल्यास त्यांना हटवण्यासाठी संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू करावी.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलीच्या शिफारशीसह त्यांच्याविरोधात चौकशी आणि महाभियोगाची प्रक्रिया राबविण्याची चर्चा आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *