पुन्हा मुख्यमंत्री होण्याबाबतच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या
Eknath Shinde's direct answer to the question about becoming the Chief Minister again; The audience raised their eyebrows

मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होऊन उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा अनेकदा होते. विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात लढवण्यात आली.
पण भाजपला तब्बल १३२ जागा मिळाल्या आणि शिंदेंची संधी हुकली. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. त्यानंतर सत्तास्थापना, पालकमंत्रिपदं यावरुन शिवसेना,
भाजपमध्ये अनेकदा चढाओढ, कुरघोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा वारंवार होत राहिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील काही वर्षांत दिल्लीला जातील, केंद्र सरकारमध्ये दिसतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एका सोहळ्यात भाष्य केलं.
मला महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ती समर्थपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. तो मी प्रामाणिकपणे करत आहे. दिल्लीत जाण्याचा कोणताही विचार नाही.
पंतप्रधानपदी २०२९ नंतरही नरेंद्र मोदीजीच असावेत, अशी आमची इच्छा आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यावर फडणवीसांची मुलाखत घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिमटा काढला.
इथे अनेक जण तुमच्या दिल्लीकडे जाण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. तेव्हा तिथे प्रेक्षकांमध्ये पहिल्याच रांगेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते.
एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची नाराजी अनेकदा दिसून आलेली आहे. त्यांच्या अनेक कृतींमधून त्यांची नाराजी अगदी स्पष्टपणे दिसते आणि त्याची राजकीय वर्तुळात चर्चाही होते.
आजच झालेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सत्तेत दोन नंबरचा पण एक नंबर होऊ शकतो, असं सूचक विधान केलं. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
विधानसभा निवडणुकीआधी शिंदे मुख्यमंत्री होते, तर फडणवीस उपमुख्यमंत्री होते. निवडणूक निकालानंतर दोघांच्या खुर्च्या बदलल्या. याचा संदर्भ देत शिंदेंना मुख्यमंत्रिपदाबद्दल छेडण्यात आलं.
त्यावर त्यांनी एक आणि दोन नंबरचं गणित सांगत आमची लढाई खुर्चीसाठी नसल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी फडणवीस आणि स्वत:चंच उदाहरण दिलं.
फडणवीस आधी मुख्यमंत्री झाले होते, ते मग उपमुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत आणि मी उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे एक नंबरचा दोन नंबर झाला.
दोन नंबरचा सुद्धा एक नंबर होऊ शकतो, हे देवेंद्रजींच्या निमित्तानं कळलं, असं शिंदे म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं म्हणजे तसं परत होऊ शकतं का, असा प्रश्न केला. त्यावर शेवटी सगळं जनता जनार्दनाच्या हातात आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं.