दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष झालेल्या अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात?
Is Anna Bansode, who became the Deputy Speaker of the Assembly two days ago, in danger of becoming an MLA?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली.
त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अण्णा बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आमदार अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे.
अण्णा बनसोडे हे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार झाले आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.
तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, जादा इच्छूक आणि मंत्रिपदे कमी यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळालं नाही.
मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. याशिवाय विविध समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अण्णांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजन वाढल्याचे चित्र आहे.
अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकिर्द 1997 पासून पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक म्हणून सुरुवात झाली. ते 2002 पर्यंत नगरसेवक पदी होते. पिंपरी चिंचवड महापलिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे.
पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
मात्र, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आपली ताकद लावली. तिसऱ्यांदा निवडून आले. पिंपरी चिंचवडचे नगरसेवक ते विधानसभेचे उपाध्यक्ष या अण्णा बनसोडे यांच्या वाटचालीत
अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. दादांच्या पाठिंब्यामुळेच बनसोडे हे उपाध्यक्षपदापर्यंत पोचले आहेत. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.