बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने अजित दादांच्या राष्ट्रवादीला धक्का
Baba Siddiqui's murder shocks Ajit Dada's nationalists
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या २५ वर्षांत मुंबईत आपले अस्तित्व निर्माण करता आले नव्हते. पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी मुंबईत विशेष लक्ष घातले होते.
बाबा सिद्दिकी व त्यांच्या आमदार पुत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक बहुल भागात पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न होता. या दृष्टीनेच बाबा सिद्दिकी यांना पक्षात विशेष महत्त्व देण्यात आले होते.
नगरसेवक ते राज्यमंत्री असा काँग्रेसमध्ये प्रवास केलेले बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला होता.
तत्पूर्वी त्यांनी गेल्या वर्षी बिहारमधून राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने राज्यसभेच्या खासदारकीसाठी प्रयत्न केले होते. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते.
त्यातूनच त्यांनी राज्यसभेसाठी प्रयत्न केले होते. पण राष्ट्रीय जनता दलाने उमेदवारी न दिल्याने बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला.
मुलाला आमदारकी दिल्यावरही त्यांना काँग्रेसमध्ये खासदारकी हवी होती. पक्षाने त्याला नकार दिल्यानेच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता.
सत्तेची कवचकुंडले हवी असल्यानेच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याचा आरोप तेव्हा काँग्रेककडून झाला होता. २०१५ नंतर त्यांना ‘ईडी’ चौकशीला सामोरे जावे लागले होते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर पक्षाने त्यांना विशेष महत्त्व दिले होते. राष्ट्रवादीचा मुस्लीम चेहरा म्हणून त्यांना महत्त्व दिले जात होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अल्पसंख्याक बहुल भागात त्यांना स्टार प्रचारक म्हणून प्रचाराला फिरविण्यात आले होते. मुंबईत पक्ष वाढीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या आदल्याच दिवशी अजित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली होती. तेव्हाही बाबा सिद्दिकी यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.
पत्रकार परिषद पार पडल्यावर व्यासपीठावर मागेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पक्षाने नेमलेले निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांच्याशी सल्लामसलत केली
तेव्हा बाबा सिद्दिकी तेथे उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्याशी चर्चेत सिद्दिकी सहभागी झाले होते.
मध्यंतरी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान आमदार असलेल्या मतदारसंघात आले होते. तेव्हा बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांचे भव्य स्वागत केले होते.
तसेच अल्पसंख्याकबहुल भागात अजितदादांची मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा वांद्रे पूर्वप्रमाणेच बाबा सिद्दिकी यांनी मुंबईच्या अन्य भागातही पक्षाची अशीच ताकद वाढवावी, अशी सूचना अजित पवारांनी केली होती.
नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर असले तरी त्यांच्यावर मर्यादा आहेत. यामुळेच पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा सिद्दिकी यांना महत्त्व देण्यात येत होते.
सिद्दीकी यांच्या हत्येने अजित पवारांच्या पक्षाला फटका बसला आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीच्या भायखळा तालुका अध्यक्षाची हत्या करण्यात आली होती. त्यापाठोपाठ सिद्दिकी यांची हत्या झाली.