भारतातील सर्वात ‘हॉट शहर ’ महाराष्ट्रात , तापमान पोहचले 44.7 अंशावर, चार दिवस उष्णतेची लाट
India's hottest city in Maharashtra, temperature reaches 44.7 degrees, heat wave continues for four days

महाराष्ट्रातील शहरे एप्रिल महिन्यात चांगलीच तापली आहे. विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान झपाट्याने वाढले आहे.
नागपूर शहर देशातील सर्वात ‘हॉट सिटी’ ठरले आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीत आज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशातील सर्वात उष्ण शहर नागपूर ठरले आहे.
महाराष्ट्रातील नागपूर शहरात शनिवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअसवर पोहचले.
याआधी शुक्रवारीच ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली होती. परंतु शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे.
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेले आहे. आठ दिवसांनी पुन्हा शहराच्या तापमानाने ४४.३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.
यापूर्वी १० एप्रिल रोजी ४४.४ अंश इतके तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर वातावरणात थोडाफार बदल होऊन तापमान ४१.५ आणि ४३ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र त्यात पुन्हा वाढ झाली.
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यामुळे दुपारी वर्दळ कमी झाली आहे.
तापमान ४४.३ अंश कमाल तर २८.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. आर्द्रता २२ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने हवामान कोरडे आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम आता धरणातील जलसाठ्यावर दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.२२ टक्के कमी साठा आहे.
१७ एप्रिल २०२४ रोजी धरणात ५३.५३ टक्के जिवंत पाणीसाठा होता, तो यंदा ४८.३१ टक्के एवढा आहे. यंदा मार्चपासूनच तापमान चाळिशीच्या पार गेले. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.