राहुल गांधींना महाराष्ट्रातील कोर्टानं ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?
Maharashtra court fined Rahul Gandhi, what is the matter?

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना ठाण्यातील कोर्टानं ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेतल्यानं
एका कार्यकर्त्यानं राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात लेखी जबाब नोंदवण्यात विलंब केल्यानं गांधी यांना कोर्टानं ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राहुल गांधी यांच्याकडून लेखी जबाब दाखल करण्यात ८८१ दिवसांचा विलंब झाला होता. त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी त्यावर माफीची विनंती करतानाच, एक अर्ज दाखल केला होता.
अय्यर यांनी राहुल गांधींच्या वतीने कोर्टात सांगितले की, ते दिल्लीत राहतात आणि खासदार असल्यानं त्यांना अनेक ठिकाणी दौऱ्यांवर जावे लागते.
त्यामुळं जबाब दाखल करण्यास विलंब झाला. कोर्टानं माफीची विनंती मान्य केली असून, लेखी जबाबही स्वीकारला आहे. मात्र, त्याचबरोबर ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
आरएसएसचे कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात पुढील सुनावणी
१५ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टातही मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
दुसरीकडे, राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा देण्याबाबतच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
तर कोर्टानं याचिकाकर्ते अशोक पांडे यांना एक लाख रुपये दंडही ठोठावला आहे. ही याचिका कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.