राज्यसभा निवडणुकीत शिन्देगटाकडून या नेत्याची लॉटरी ? ;पहा कोणाचा कार्यकाळ संपतोय
The lottery of this leader from the Shinde group in the Rajya Sabha elections? ;See who's term is ending

येत्या मार्च महिन्यात महाराष्ट्रातून सहा जणांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी होणाऱ्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
यात अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले मिलिंद देवरा यांचा समावेश करता येईल. त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या सदस्यांची जागा धोक्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविलेल्या सहा जणांची मुदत २ एप्रिलला संपणार आहे. यासाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे.
यात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन (सर्व भाजप), खासदार अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट) व कुमार केतकर (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने यावेळी महाविकास आघाडीच्या सदस्यांना राज्यसभेचे ‘विमान’ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
फूट पडण्यापूर्वी ‘मविआ’कडे १५६ सदस्यांचे बळ होते. फुटीनंतर आता सर्वात मोठा पक्ष काँग्रेस झाला असून महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या ७५ राहिली आहे.
यामुळे राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला दोन राज्यसभा सदस्य निवडून आणणे कठीण जाणार आहे. तिन्ही पक्ष मिळून केवळ एकच सदस्य ते निवडून आणू शकतात.
दुसरा सदस्य निवडून आणण्यासाठी अपक्ष किंवा फुटीर मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक ४५ सदस्य असल्याने काँग्रेसच्या एका नेत्याला राज्यसभेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
याउलट महायुतीची स्थिती भक्कम झाली आहे. भाजपचे १०४ आणि अपक्ष मिळून भाजपची मोट १२० सदस्यांची आहे. यात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट जमा झाल्याने महायुतीकडे २०० पेक्षा अधिक आमदार उभे आहेत.
भाजपकडून नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु नारायण राणेंच्या सुपुत्राला सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरही दावा करता येणार नाही.
शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची बिदागी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा पदर सोडून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
एकनाथ शिंदे गटाचा राज्यसभेत एकही सदस्य नाही. सध्या शिवसेनेचे राज्यसभेतील तिन्ही सदस्य उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान आहेत. यामुळे शिंदे गटाला राज्यसभेत एक जागा हवी आहे. यासाठी मिलिंद देवरा यांची उमेदवारी भक्कम मानली जात आहे.
अजित पवार गटाकडे किमान ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. ते स्वबळावर खासदार पाठवू शकणार नाही. परंतु या गटाचीही राज्यसभा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे.
परंतु मिळालेल्या माहितीवरून भाजप चार उमेदवार निवडणुकीत उतरविणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची ९ मते फुटली होती. त्यामुळे काँग्रेसची मते फोडण्याची जबाबदारी घेतल्यास अजित पवार गटालाही एक राज्यसभा मिळू शकते.