सरकारमध्ये धुसफूस, भाजप-शिंदे गट VS अजित पवार गट यांच्यात संघर्ष पेटला
Disruption in the government, conflict erupted between BJP-Shinde group VS Ajit Pawar group
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं.
विशेष म्हणजे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन भाजपमध्ये प्रचंड धुसफूस असल्याची तेव्हाच चर्चा होती. कारण त्यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते.
तर अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन पडद्यामागे बरीच खलबतं झाली. त्यानंतर अखेर अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या बदल्यात दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असली तरी पुण्यात सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसतंय. कारण पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीमधील शिंदे गट
आणि भाजपच्या सदस्यांनी अजित पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठं राजकीय ‘महाभारत’ घडण्याची चिन्हं दिसत आहेत.
अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतलाय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांच्या याद्यांना मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यात आलीय,
तसेच अजित पवार त्यांच्या गटातील लोकांना झुकतं माप देत असल्याचा भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा आरोप आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ती कामं रद्द करा, असं निवेदन सदस्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलंय.
यामध्ये भाजपा आणि शिंदे गटाला नाममात्र फंड उपलब्ध करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील आणि जीवन आप्पा कोंडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.
800 कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय. यामुळे जिल्हा नियोजन समितीत भाजप, एकनाथ शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशा नव्या वादाला सुरुवात झालीय.
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने भाजप-शिंदे गटाच्या कामांना कात्री लागल्याने, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र आहे.
तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांच्या मंजूर याद्यांमध्ये मोठे फेरबदल झाल्याची चर्चा आहे.
तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत मंजूर केलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. अनियमितपणे अजित पवार गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामांचा भरणा करण्यात आलेला आहे,
असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामावरून पुणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.