दोन मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर
Two Chief Ministers on ED's radar
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीच्या रडारवर दोन्ही नेते आहेत.
दोन्ही नेत्यांना ईडीने वारंवार समन्स धाडलं आहे. मात्र दोन्ही नेते ईडीसमोर जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या संबंधित ठिकाणी ED कडून छापेमारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या संबंधित ठिकाणी ED कडून छापेमारी सुरु आहे. बेकायदेशीर खाण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रेस सल्लागार अभिषेक प्रसाद उर्फ पिंटू यांच्या घरावर ईडीचे छापे सुरू आहे.
अभिषेक प्रसाद यांचे निवासस्थानावर छापेमारी सुरू आहे. सोबतच साहेबगंज उपायुक्तांच्या निवासस्थानासह इतर 12 ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू आहे.
दुसरीकडे, ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता महागठबंधनच्या सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स आलं होतं, मात्र सात समन्स आल्यानंतरही सोरेन चौकशीला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे ED सोरेन यांच्यावर मोठी कारवाई करेल, अशी चर्चा सुरू असताना सोरेन यांनी ही बैठक बोलावली आहे.
दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दावा केला आहे की, सोरेन आपल्या पत्नी यांना मुख्यमंत्री करणार आहेत. मात्र हेमंत सोरेन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे आणि भाजपकडून अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा देखील आरोप केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र अरविंद केजरीवाल आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहून न येण्याबाबत कळवलं आहे.
ईडीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत, पण ED कडून आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं आपने म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा ED चा हेतू आहे. केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखायचे आहे, त्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप देखील आपकडून केला जात आहे