मुख्यमंत्री शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना ; नार्वेकरांचा निर्णय
Chief Minister Shinde's Shiv Sena is the real Shiv Sena; Stamped by the Norwegians
संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज, बुधवारी निकालाचं वाचन केलं.शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचं, नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करताना ठळक मुद्द्याचं वाचन केलं आहे. निकाल जाहीर करताना नार्वेकर म्हणाले आहेत की, ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत.
याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.
निकाल वाचताना ते पुढे म्हणाले, २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे.
प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही.
नार्वेकर म्हणाले, माझ्यासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शिवसेनेत २१ जून २०२२ पासून दोन गट झाल्याचंसमोर आलं.
त्यामुळे पुढील प्रश्नांवर विचार केला.
१. २०१८ सालचं पक्षातं नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार होतं का?
२. पक्षप्रमुखाची इच्छा हीच पक्षाची इच्छा मान्य केली जायला हवी का?
”शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये १९ मधील १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते.
तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत”, असं राहुल नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल निकालात महत्वाची टिपणी करत नार्वेकर म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही.
त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरुन काढू शकत नाही.
पक्षप्रमुखांचं मत हे अंतिम नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाहीत. एकनाथ शिंदेंची पक्षातील हकालपट्टी मान्य करता येणार नाही.