India आघाडीच्या अध्यक्षपदी खरगे? नितीश कुमार संयोजकपदीKharge as President of India Alliance? Nitish Kumar as Convenor

इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक झाली आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तर मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार याची आघाडीच्या संयोजकपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
आजच्या व्हर्च्युअल बैठकीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव उपस्थित नव्हते. बैठकीत जागावाटपाबाबतही चर्चा झाली आहे.
सूत्रांनी सांगितलं की, आजच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर या तिन्ही अनुपस्थित नेत्यांशी चर्चा करून पुढे निर्णय घेतला जाईल.
जेडीयूच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी अध्यक्ष लालन सिंह आणि संजय झा सहभागी झाले होते. जेडीयू नेते संजय झा म्हणाले की,
व्हर्च्युअल बैठकीत काँग्रेसने नितीश कुमार यांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर नितीश कुमार म्हणाले की, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांपैकी कोणी एकाने इंडिया आघाडीचं अध्यक्ष बनायला हवं.
संजय झा यांच्या म्हणण्यानुसार, नितीश कुमार यांनी संयोजक होण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. बैठकीत नितीश कुमार म्हणाले, ‘मला कोणत्याही पदात रस नाही.
युती ग्राउंड लेव्हलवर पुढे जावी, अशी आमची इच्छा आहे. महाआघाडीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे आहे.
नितीश कुमार म्हणाले की, जागावाटप हे सर्वात मोठे आव्हान आहे. मोठ्या पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल नितीश म्हणाले की, हे चांगले लक्षण नाही.
ममता बॅनर्जी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत बैठकीला हजर राहिल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीला
उपस्थित न राहण्यामागील कारण ममता यांची नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण नितीश कुमार यांना संयोजनक बनवण्यावर त्यांचे एकमत नाही.