मंत्रीमंडळ विस्तार का रखडला?खडसेंनी सांगितले कारण
Why was the cabinet expansion delayed? Khadse said the reason

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आठवडाभराचा कालावधी लोटला आहे. असं असूनही अजून महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही.
तिन्ही पक्षाकडून जास्तीत जास्त मंत्रीपदांवर दावा केला जातोय. त्यामुळे महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच वाढत जाताना दिसत आहे.
अर्थ आणि गृह यासारखी महत्त्वाची खाती भाजप सोडायला तयार नाही आणि शिंदे गट आणि अजित पवार गटाकडूनही माघार घेतली जात नाहीये.
महायुतीच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारलं असताना एकनाथ खडसे म्हणाले, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी बराच वेळ लागला.
आता देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. यामुळे तिन्ही पक्षांत एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना असल्याचं दिसून येत आहे.
तिघांना वाटत असेल की आपल्यालाच जास्त मंत्रीपदं मिळावीत. त्यामुळे कदाचित हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असावा. ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपद मिळणं हे स्वाभाविक आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर देखील भाष्य केलं.
महाराष्ट्रातील निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. आम्ही निवडणूक खूप जवळून बघितली. त्यामुळे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे वाटलं नव्हतं.
महायुतीचे सर्व आमदार मोठ्या मताधिक्याने तर महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार फार कमी मताधिक्याने निवडून आले. काही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तर त्यांच्या गावात शून्य मतदान होते.
त्यामुळे संशयाला जागा आहे. परंतु तरी आम्ही पराभव मान्य केला असून पुढील वाटचाल सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली.