सचखंड एक्सप्रेससह विविध रेल्वे १४ दिवसांसाठी रद्द
Various trains including Sachkhand Express canceled for 14 days

नांदेड विभागातून उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे आगामी काही दिवस रद्द करण्यात आलेल्या आहेत. मथुरा यार्ड रिमोडलिंगच्या कामासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे सचखंड एक्स्प्रेससह दिल्लीसाठी जाणारी साप्ताहिक रेल्वेही रद्द करण्यात आली आहे.
उत्तर मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मथुरा रेल्वे स्टेशन येथे यार्ड रिमॉडेलिंगचे काम घेण्यात आलेले आहेत. या कामासाठी मेगा लाइन ब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेगा लाइन ब्लॉकसाठी मराठवाड्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या एकूण सहा रेल्वे रद्द करण्यात आलेले आहेत. या रेल्वे रद्द झाल्याने दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे
– नांदेड येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी, २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
– अमृतसर येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस २३ जानेवारी ते सहा फेब्रुवारी २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
– नांदेड येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७५१ नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस २६ जानेवारी आणि दोन फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
– जम्मू तावी येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७५२ जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस २८ जानेवारी आणि चार फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
– नांदेड येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७५३ नांदेड-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक २३ आणि ३० जानेवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
– हजरत निजमुद्दीन येथून सुटणारी रेल्वे क्र. १२७५४ हजरत निजामुद्दीन – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक २४ आणि ३१ जानेवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
आगामी २२ जानेवारीला अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमानंतर देशभरातून अनेक जण अयोध्या येथे भगवान श्रीरामचे दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या नियोजनात होते.
मात्र, चार फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारताकडे जाणारी रेल्वे रद्द करण्यात आल्याच्या कारणाने शहरातील भाविकांनाही रामल्लांचे दर्शन करण्यासाठी रेल्वेने जाणे चार फेब्रुवारीनंतरच शक्य होणार आहे.