एकीकडे न्यायालयीन लढाई दुसरीकडे भेटीगाठी ;पवार कुटुंबात चाललंय तरी काय ?

Court battle on one hand, meeting on the other; what is going on in the Pawar family? ​

 

 

 

 

एकीकडे पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दोन बड्या नेत्यांनी भेट घेतली.

 

 

 

आज सकाळीच राज्याचे सहकारमंत्री आणि शरद पवारांचे विश्वासू पण सध्या अजित पवारांसोबत असलेले नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली.

 

 

 

त्यानंतर दुपारी अजित पवार यांचीही शरद पवारांसोबत भेट झाली. दिवाळीचं निमित्ताने या भेटीगाठी होत आहेत. पण एकीकडे पक्ष फुटीनंतर टोकाची लढाई सुरु असताना, दुसरीकडे या भेटीगाठी होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

 

दिलीप वळसे पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तर शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांसह सर्व पवार कुटुंब उपस्थित होतं.

 

 

 

दरम्यान, “शरद पवार यांची मी घेतलेली भेट ही पूर्वनियोजीत होती. माझ्यासोबत यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी देखील होते. या भेटीत रयत शिक्षण संस्थेसंदर्भात चर्चा झाली.

 

 

रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ या संस्थामध्ये मी काम करतो.

 

 

 

या संस्थामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेत आलो”, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

 

 

 

संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द शरद पवार यांचा की अजित पवार यांचा असा सवाल वळसे पाटलांना करण्यात आला, यावेळी अंतिम शब्द शरद पवार यांचाच असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

 

 

 

दरम्यान, एकीकडे दिलीप वळसे पाटील आणि शरद पावारंच्या भेटीची चर्चा असताना, दुपारी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी ही भेट झाली.

 

 

 

यावेळी पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. दिवाळी आणि प्रतापराव पवार यांचा वाढदिवस यानिमित्त ही भेट झाल्याचं, शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी सांगितलं.

 

 

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

 

 

भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबाबत काल गुरुवार निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शरद पवार गटाने जोरदार युक्तीवाद केला.

 

अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. यातील काही शपथपत्रं ही अल्पवयीन मुलांच्या नावावर असल्याचा आरोपही शरद पवार गटाने केला.

 

 

शरद पवार गटाकडून 30 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले आहेत.आता पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

 

 

एकीकडे बनावट शपथपत्र आणि जोरदार युक्तीवाद अशी निवडणूक आयोगातील लढाई सुरु असताना, तिकडे पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. जरी या भेटी दिवाळीनिमित्त होत असल्या तरी राजकीय चर्चा मात्र जोर दरत आहेत.

 

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावं याबद्दल मी काय बोलू? पवार कुटुंबियांनी काय करावे हा त्यांचा मुद्दा आहे.

 

 

त्याबद्दल मी काय बोलणार ? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला, असं जयंत पाटील म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *