एकनाथ खडसेचे हृदय ऑपरेशन टेबलवर बंद पडले , डॉक्टरांनी शॉक देऊन जीव वाचवला:

Eknath Khadse's heart stopped on the operating table, doctors saved his life by giving him a shock:

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती.

 

 

 

त्यामुळे एकनाथ खडसे यांना उपचारासाठी तातडीने जळगावहून मुंबईत आणण्यात यश मिळाले होते. यानंतर त्यांच्यावर बॉम्बे रुग्णलायत अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

 

 

 

या दुखण्यातून सावरल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन त्यांचे आभार मानले आहेत. फोनवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलताना एकनाथ खडसे थोडेसे भावूक झाले होते.

 

 

 

तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं, असे कृतज्ञ उद्गार काढत नाथाभाऊंनी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले.

 

 

 

 

एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

 

 

 

‘काय झालं माहिती आहे का, मला एअर ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. नाशिकला एक एअर ॲम्ब्युलन्स उभी होती. पण त्याला हवाई वाहतूक विभागाकडून क्लीअरन्स मिळत नव्हता.

 

 

 

पण तुम्ही बोलल्यामुळे लवकर क्लिअरन्स मिळाला. मला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात मला तातडीने ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले.

 

 

 

त्यावेळी डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या हृदयात दोन धमन्यांमध्ये १०० टक्के ब्लॉकेज होते. तर तिसरा ब्लॉकेज ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशनचा निर्णय घेतला.

 

 

 

त्यावेळी मला एका स्ट्रेचरवरुन दुसऱ्या स्ट्रेचरवर उचलून ठेवत असताना मला अचानक कार्डिॲक अरेस्ट आला. त्यामुळे माझं हृदय बंद पडलं. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा,

 

 

ऑक्सिजनही थांबला. तेव्हा डॉक्टरांनी दीड मिनिटांमध्ये लगेच उपचार केले. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले’, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार मानले. त्यावेळी तुमचं ते विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं, असे खडसे यांनी म्हटले.

 

 

 

त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना संभाषणाच्या शेवटी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते.

 

 

 

तेव्हा खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. या फोननंतर एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *