बैठकीतच शरद पवारांची तब्बेत बिघडली;डॉक्टरांकडून तात्काळ तपासणी
Sharad Pawar's health deteriorated in the meeting itself; immediate examination by the doctor

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे.
तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
काल रात्रीपासूनच शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहे. दिवाळीनिमित्त दरवर्षी शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीय बारामतीत असतात. सकाळी ते दहा वाजताच्या सुमारास गोविंद बाग या आपल्या निवासस्थानातून एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे बैठकीसाठी गेले होते.
त्यानंतर दुपारी चार वाजता विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे गेले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत त्यांनी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले.
खासदार सुळे यांनी तात्काळ हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना बोलावून घेत पवार यांची तपासणी केली. डॉक्टरांनी पवार यांचा एसीजी काढला.
सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले. डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पवार यांचा उद्याचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.