महाराष्ट्रात अवकाळी संकट; ‘या’ आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Unseasonal crisis in Maharashtra; Rain warning for 'these' eight districts

देशभरातच वातावरणाचे चक्र पूर्णपणे बिघडले असून हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे.
जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा हवामान बदलले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीसह झालेल्या जोरदार पावसाने
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज खात्याने व्यक्त केला आहे. येत्या २५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. २५ फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील यासंबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.