पंतप्रधान मोदीं दौरा ;आक्रमक शेतकरी डिकाशन चहा पिऊन करणार ‘चाय पे चर्चा’
Prime Minister Modi's tour; Aggressive farmers will drink decoction tea and 'Chai Pe Charcha'

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यासाठी यवतमाळमध्ये
[डिकाशन] काळ्या ‘चाय पे चर्चा’चं आयोजन करण्यात आलं आहे. यवतमाळच्या दाभडी (बोरगांव) येथील शेतकरी काळा चहा पिऊन चाय पे चर्चा करणार आहेत.
२० मार्च २०१४ साली नरेंद्र मोदी हे दाभडीत आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती.
त्यापैकी एकही अश्वासन पूर्ण न झाल्याने आठवणीतील चाय पे चर्चा म्हणून शेतकरी डिकाशन काळा चहा पिणार आहेत.
याबाबत दाभडीत बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर लिहिलं की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? कापसावर आधारित उद्योग आणणार होते,
त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार होते, पुढे काय झालं? काळंधन वापस आणणार होते, आम्हाला काहीच समजलं नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र यांची २८ फेब्रुवारी रोजी सभा पार पडणार आहे. त्यासाठी 26 एकर जागेत भव्य स्टेज आणि मंडप उभारण्यात येत आहे.
मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी स्टेज आणि मंडपची पाहणी केली असता त्यांच्यासोबत अधिकारी वगळता जिल्ह्यातील एकही आमदार नव्हता.
मात्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्टेज आणि मंडपची पाहणी करण्यासाठी आले असताना भाजपचे सर्व आमदार महाजनांसोबत दिसून आल्याने महायुतीमधील गटबाजी
या निमित्याने चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पालकमंत्री संजय राठोड हे शिवसेना शिंदेगटाचे असून जिल्ह्यात सहा आमदार हे भाजपचे आहेत.