जागावाटपावरून भाजपमुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले
The tension of the Shinde group increased due to the BJP over seat allocation
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय पक्षांच्या हलाचाली चांगल्याच वाढल्या आहेत. नेते मंडळींनी तर सभा, मेळावे, बैठकांचा सपाटा लावला आहे.
यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मतदारसंघासाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
दक्षिण मुंबई पाठोपाठ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरही भाजपचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची धडधड वाढली आहे. शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं.
यानंतर पुढे राष्ट्रवादीचा अजित पवार गटही महायुतीत सहभागी झाला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट
अशा तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून तीनही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.
यातच शिवसेना शिंदे गटाच्या काही लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं बोललं जात आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकरांच्या मतदारसंघावर भाजपचे लक्ष आहे.
त्यामुळे गजानन किर्तीकरांसह शिंदे गटाचेही टेन्शन वाढले आहे. गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघावर आता भाजपचा डोळा असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाकडून गजानन किर्तीकर तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. तर गजानन किर्तीकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगाच ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
गजानन किर्तीकर विरुद्ध अमोल किर्तीकर अशी लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
मात्र, किर्तीकरांचे वाढते वय लक्षात घेता, ही जागा किर्तीकरांसाठी अनुकूल नसल्याची माहिती सर्व्हेतून समोर आल्याचेही बोलले जात आहे.
त्यामुळे या जागेवर महायुतीकडून फोकसं केलं जात आहे. भाजप ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. पण शिवसेना शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नाही.
या ठिकाणी पर्यायी उमेदवाराची चाचपणी महायुतीकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यातच गजानन किर्तीकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेतूनच विरोध होत आहे. तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या ) प्रयोगानंतर अनेक मतदारसंघात राजकीय गणितं बदलली आहेत.
त्यामुळे या बदललेल्या गणिताचा विचार करत भाजपने सर्वाधिक लक्ष हे मुंबईवर केंद्रीत केलं असून मुबंईतील चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे.
दरम्यान, महायुतीच्या लोकसभा जागावाटपानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, आणि कोणाला डच्चू मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.