ममता बॅनर्जींच्या कोलकात्यामधील रुग्णालयात दाखल
Mamata Banerjee admitted to hospital in Kolkata
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दुखापतग्रस्त झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे.
टीएमसीने त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आमच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” टीएमसीने ममता बॅनर्जी यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
यामध्ये त्यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याचं दिसत आहे. कपाळातून रक्तस्राव होत असून रक्ताचे ओघळ मानेपर्यंत घसरले आहेत.
ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
दुखापतीचे फोटो समोर येण्यापूर्वी ममता बॅनर्जी घरातल्या ट्रेडमिलवर चालताना पडल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली होती.
परंतु, तृणमूलने ज्या दुखापतीचं वृत्त जारी केलं आहे ती दुखापत नेमकी कशामुळे झाली आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ममता यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
डोक्याला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली.
घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं,
तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागल्यामुळे त्या पाय घसरुन पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला झालेल्या दुखापतीला घातला आहे.
डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले की, “आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून ढकलल्यामुळे त्या घरात पडल्या आहेत.
त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले की, “रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी
ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
ममता बॅनर्जी यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. वर्धमान येथून कोलकात्याला जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता. वर्धमानमधील पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या.
शिवाय त्या हेलिकॉप्टरने प्रवास करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या कारने माघारी परतत होत्या. परंतु, दाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं.
तेव्हा त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.
याआधी २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा अनेक दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी
ममता यांच्या पायाला दुखापत झाली होती. नंदीग्राम येथील प्रचारसभा संपवून परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता.