महाराष्ट्रातील खासदाराने मोदींना राखी बांधली तरीही उमेदवारी धोक्यात
Maharashtra MP tied rakhi to Modi but candidature in jeopardy

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस उरले असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात
महायुतीचा उमेदवार घोषित केला नसल्याने या मतदार संघात महायुतीचा कोण उमेदवार असणार यावर चर्चा रंगली आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काहीच दिवस बाकी असताना महायुती कडून अद्यापही उमेदवारी घोषित केली नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नागरिकांना पडला आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ विद्यमान खासदार भावना गवळी यांचा बालेकिल्ला मानला जातो. गवळी या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आल्या आहेत.
सहाव्यांदा सुद्धा निवडणूक लढण्यास त्या इच्छुक आहेत. मात्र अद्याप त्यांच्या नावाची घोषणा महायुती कडून करण्यात आली नाही. भाजपने केलेल्या सर्वेनुसार खा. भावना गवळी
यांच्याबद्दल मतदारांमध्ये रोष असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात असून महायुतीकडून उमेदवार बदलण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागत असल्याची चर्चा आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लकी मतदारसंघ मानला जातो. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी
याच मतदार संघातून केली आणि सलग दोन वेळा ते पंतप्रधान झाले. २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथे महिला मेळावा घेऊन फोडला. गवळींनी मोदींना राखी बांधली होती. त्यामुळे त्यांच्यात भावाबहिणीचे नाते आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदे सेनेकडे आहे. त्यातच खा. भावना गवळी यांना मतदारांचा विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदलण्याच्या सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या आहेत.
गवळी यांच्या जागी मंत्री संजय राठोड यांना मतदारांची पसंती असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. मात्र संजय राठोड यांनी उमेदवारी नाकारून खा. भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी द्यावी
अथवा सहा वेळा खासदार राहिलेले माजी खा. उत्तम पाटील यांचे पुत्र यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांना संधी द्यावी असे सुचवल्याचे कळते. त्यामुळे या मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.
भावना गवळी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.
गवळी यांच्या उमेदवारी वरून महायुतीत पेच निर्माण झाला असून त्यांना महायुती तिकीट देणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
गवळी यांना जरी उमेदवारी दिली नाही तरी मात्र महायुतीत हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला असल्याने इथ शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला उमेदवारी देणार आणि संजय देशमुख विरुद्ध कोण उमेदवार असणार याची उत्सुकता नागरिकांना लागून आहे.