शिंदेंचा पुन्हा एक खासदार ठाकरेंच्या संपर्कात?
Another MP of Shinde in contact with Thackeray?

महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संवाद सभेचे सिन्नर येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी संवाद सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संवाद यात्रेत बोलत होते. महायुतीतील उमेदवारीसंदर्भात बोलताना त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गोडसेंऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या चर्चांवर बोलताना ‘ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्यांना आता उमेदवारीसाठी मुंबईला फिरावं लागत आहे’ अशा शब्दात बडगुजर यांनी गोडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी न देण्याच्या भूमिकेत सध्या महायुती आहे. नाराज खासदार हेमंत गोडसे
हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला. ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर
यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. हेमंत गोडसे यांची तीन माणसं माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या, असे ते म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं आता गद्दारांना माफी नाही.
वेळ निघून गेली आहे, तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा. बडगुजर यांनी यापूर्वी देखील हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर येथील संवाद मेळाव्यात बडगुजर बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.
बडगुजर यांनी यापूर्वी गोडसे पुन्हा ठाकरे सेनेत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. हेमंत गोडसे यांची पतंग आता कटल्याची कोपरखळी देखील
बडगुजर यांनी या मेळाव्यात लगावली. गोडसे यांना उमेदवारीसाठी सारखे मुंबईला जावे लागत असल्याचा देखील टोला सुधाकर बडगुजर यांनी लगावला.
हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतला आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आज सिन्नर येथे संवाद मेळावा घेत वाजे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. हेमंत गोडसे यांना दोन वेळा ठाकरे यांनी उमेदवारी दिली
आणि नाशिक लोकसभेचे खासदार म्हणून देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आणल्याचा दावा ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे.
मात्र तिसऱ्यांदा गोडसे यांना हॅट्ट्रिक करण्यासाठी महायुतीकडूनच विरोध होत असल्यामुळे गोडसे यांचा मोठा हिरमोड होत असल्याचा पाहायला मिळत आहे.
तिसऱ्यांदा नाशिक लोकसभेतून निवडून येण्याचा गोडसेंचा मार्गच आता महायुतीकडून रोखला जात असल्यामुळे गोडसे यांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे हेमंत गोडसे हे पुन्हा मातोश्रीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमधील वाजे यांच्या संवाद मेळाव्यात मोठं वक्तव्य करत हेमंत गोडसे
हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या दाव्यावर खासदार हेमंत गोडसे हे नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.