परभणी,नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा
PM Modi's meeting in Parbhani, Nanded
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी दोन्ही नेते
एकपाठोपाठ एक जंगी सभा घेत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच मोदींनी चंद्रपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात जंगी सभा घेतल्या होत्या.
या सभेतून त्यांनी शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. आता नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याचा प्लान आखला आहे. १९ एप्रिलला पंतप्रधान मोदी वर्ध्यात तर २० एप्रिलला परभणी आणि नांदेडमध्ये सभा घेणार आहेत.
या सभेतून ते एनडीएने मागील १० वर्षीत केलेली विकासकामे तसेच राबविलेल्या योजनांची माहिती मतदारांना सांगणार आहेत.
महायुतीने वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस, परभणी येथून महादेव जानकर आणि नांदेडमधून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या तिन्ही उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी जंगी सभा घेणार आहेत. मोदींच्या या सभांमुळे निश्चितच महायुतीची ताकद वाढणार आहे.
दुसरीकडे मोदींच्या या सभांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते देखील याठिकाणी जंगी सभा घेणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रविवारी विदर्भ दौऱ्यावर असून ते चंद्रपूर-भंडारा लोकसभा मतदारसंघातील साकोली येथे सभा घेणार आहेत.
या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. विशेष बाब म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील शनिवारी (ता. १३) साकोलीत सभा घेत
भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. राहुल गांधीच्या टीकेला अमित शहा आजच्या सभेतून काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.