मुख्यमंत्री शिंदेनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला डझनभर मंत्र्यांची दांडी
Dozens of ministers protested at the cabinet meeting called by Chief Minister Shinde
राज्यात दिवाळी सणानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला जवळपास डझनभर मंत्र्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. मतदारसंघात दिवाळीच्या निमित्ताने सुरू असलेले कार्यक्रम अद्याप संपले नसल्याने या मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. बुधवारपर्यंत दिवाळी सण होता. दिवाळीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
राजकीय पक्षांकडून याच कालावधीत मतदारांना समोर ठेवत दिवाळी पहाट, तसेच विविध वस्तूंचे वाटप केले जाते. त्यातही मंत्र्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
बुधवारी दिवाळी संपली, मात्र त्यानंतर शुक्रवारी आयोजित मंत्रिमंडळ बैठकीला अनेक मंत्र्यांनी पाठ फिरवली. यामागे विविध कारण असून काहींनी मतदारसंघातील कार्यक्रमांमुळे,
काहींनी देवदेर्शनामुळे मुंबईत मंत्रालयाकडे येण्याचे टाळल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, दादा भुसे, तानाजी सावंत, विजयकुमार गावीत, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा आणि सुधीर मुनगंटीवार
आदी उपस्थित होते, तर छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, उदय सामंत, अतुल सावे, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे-पाटील, रवींद्र चव्हाण, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, संदीपान भुमरे आणि गुलाबराव पाटील यांनी पाठ फिरवली.
‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद २०२३’चा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
सकाळी ९ वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ही प्री-कॅबिनेट बैठक झाली. दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे दोन मंत्री बैठकीसाठी वेळेत आले. बाकीचे मंत्री जवळपास दीड तास उशिरा पोहोचले.