मंगळसूत्रावरून भाजपचीच झाली मोठी कोंडी ;बघा काय घडले ?
BJP got into a big dilemma over Mangalsutra; see what happened?

कर्नाटकातील जनता दलाचे (सेक्युलर) हासन मतदारसंघातील उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी 33 वर्षीय खासदार प्रज्ज्वल आणि त्यांचे वडील आमदार एच. डी. रेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्ज्वल हे देशाबाहेर पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
अत्याचाराच्या या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मौन बाळगले आहे. त्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
हासन मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान झाले आहे. प्रज्ज्वल यांचा पक्ष केंद्रातील सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ज्वल यांच्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाहीर सभाही घेतली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी प्रज्ज्वल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.
आता पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रज्ज्वल हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत.
ऐन लोकसभा निवडणुकीत उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे जनता दल (सेक्युलर) आणि भाजपलाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रज्ज्वल यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाचे शेकडो व्हिडिओ आले आहेत.
त्यानंतर महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे देवेगौडा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवरच नव्हे, तर अन्य शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावर आहे.
तशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील व्हिडिओ धक्कादायक आहेत, असे महिला आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कळवले आहे.
महिला अत्याचारांच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत संवेदनशीलता दाखवली आहे. कर्नाटक येथील प्रकरणात मात्र त्यांनी मौन बाळगले आहे.
त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ट्विट केले असून, त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त करत पंतप्रधान
आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली महिलांचे मंगळसूत्र आणि दागिन्यांची चर्चा करत आहेत. कर्नाटकमध्ये मोदींनी ज्याच्यासाठी मते मागितली, त्याने हजारो महिलांसोबत दुष्कर्म केले आहे.
आपले पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे याबाबत काय मत आहे, हे मला विचारायचे आहे. मोदीजी, देशातील कोट्यवधी महिलांना याचे उत्तर हवे आहे.
मंगळसूत्रावर बोलण्याआधी देशातील महिलांना उत्तर द्या,” असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. या पीडित महिलांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदनांवर आपण काही बोलणार नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी मोदी यांना विचारला आहे.
कर्नाटकातील या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. भाजपच्या नेत्यांना खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या या कृत्यांची माहिती होती. त्यांनी ती माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिली होती.
असे असतानाही भाजप आणि मोदींनी त्यांना उमेदवारी का दिली, असा हल्लाही काँग्रेसने चढवला आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे,
की डिसेंबर 2023 मध्येच भाजपच्या एका नेत्याने प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या कृत्यांची माहिती नेतृत्वाला दिली होती. याची माहिती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ज्वल यांच्यासाठी मते मागितली.
प्रज्ज्वल यांना दिलेले मत माझे हात मजबूत करील, असेही मोदी जाहीर सभेत म्हणाले होते. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. बृजभूषण शरण सिंह,
कुलदीप सेंगर आणि आता प्रज्ज्वल रेवन्ना.. पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी यांनी आपला खरा चेहरा दाखवला आहे, अशी प्रखर टीका जयराम रमेश यांनी केली आहे.