उद्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान ११ पैकी सात जागा राखण्याचे महायुतीपुढे आव्हान
The third phase of voting tomorrow is a challenge for the Grand Alliance to retain seven seats out of 11

राज्यात तिसऱ्या टप्प्यात उद्या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होत असतानाच, महायुतीला गेल्या वेळी जिंकलेल्या सात तर महाविकास आघाडीला चार जागा कायम राखण्याचे आव्हान असेल.
बारामती, माढा, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदासंघांतील लढती चुरशीच्या झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या रायगड, लातूर, सोलापूर, माढा,
सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या सात जागा सध्या महायुतीकडे आहेत. बारामती, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे चार मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीसाठी उद्याची लढत अधिक आव्हानात्मक आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमधील लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ कायम राखणे हे शरद पवार यांच्यासाठी जसे प्रतिष्ठेचे आहे
तसेच अजित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. बारामतीच्या निकालावर अजित पवार यांचे महत्त्व ठरणार आहे. यामुळेच गेली १५ दिवस अजित पवार हे बारामीतमध्ये ठाण मांडून बसले होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने राज्यसभेची उमेदवारी नाकारून त्यांना लोकसभेसाठी उभे केले आहे.
निकाल विरोधात गेल्यास राणे यांच्या भविष्यातील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. राणे यांच्यासाठी ही लढत म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे.
राणे यांनी विजय संपादन केल्यास कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा बसू शकतो. यामुळेच राणे आणि ठाकरे गटाने सारी ताकद या मतदारसंघात पणाला लावली आहे.
रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविणारे तटकरे यांच्यासमोर ठाकरे गटाचे अनंत गीते यांचे मोठे आव्हान आहे.
तटकरे आणि गीते यांच्यात ही तिसरी लढत आहे. यापूर्वी उभयतांनी प्रत्येकी एकदा विजय प्राप्त केला होता. तिसऱ्यांदा कोण बाजी मारतो याची उत्सुकता असेल.
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांचीही कसोटी आहे. कारण सातारा मतदारसंघ गेली २५ वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
गेल्या वेळी राजीनामा दिल्यावर झालेल्या पोटविवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला होता. यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे कडवे आव्हान उदयनराजे यांच्यासमोर आहे.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने लढणारे छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीने राजा विरुद्ध प्रजा असा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सातार आणि कोल्हापूरमधील लढत या दोन छत्रपती रिंगणात असल्याने चुरशीच्या झाल्या आहेत.
माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियाने भाजपच्या विरोधात बंडखोरी केल्याने चर्चेत आली आहे. भाजपला आधी सोपी वाटणारी ही लढत शेवटच्या टप्प्यात अवघड झाली आहे.
सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होत आहे. लागोपाठ दोन पराभवांचा बदला घेण्यासाठी सुशीलकुमार शिंदे
यांची कन्या प्रणिती शिंदे या रिगणात उतरल्या आहेत. लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील लढतती ही जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.
सांगलीतील लढत कमीलीची चुरशीची झाली आहे. भाजपचे संजय पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.