मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा देणाऱ्या तरुणाने सांगितले कारण
The young man who announced on onions in Modi's rally said the reason
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या टप्प्यासाठी प्रचार करत असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सभा घेतली. यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती.
ज्यामुळे पंतप्रधान मोदींना कांद्यावर बोलावे लागले होते. घोषणा देणारा तरूण शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला.
या घोषणाबाजीनंतर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. खुद्द शरद पवार यांनीही या घोषणाबाजीचे समर्थन केले. त्यानंतर आता ज्या तरूणाने ही घोषणाबाजी केली, त्याने त्यामागची पार्श्वभूमी सांगितली आहे.
घोषणाबाजी करणाऱ्या तरूणाचे नाव किरण सानप असून आज (दि. १७ मे) त्याने शरद पवार यांची नाशिक येथे भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना
किरण सानप याने सर्व घटनाक्रम सांगितला. “१५ मे रोजी मी पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य नागरिक म्हणून उपस्थित होतो. पंतप्रधानांचे भाषण मी काळजीपूर्वक ऐकत होतो.
आमच्या प्रश्नांवर ते बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते हिंदू-मुस्लीम आणि धार्मिक मुद्द्यावर बोलत राहिले. १५-२० मिनिटांनी माझा धीर सुटला, त्यामुळे मी त्यांना कांद्यावर बोलण्याची विनंती केली”, असे किरण सानप यांनी सांगितले.
किरण सानप पुढे म्हणाले की, मी शरद पवार यांना माननारा कार्यकर्ता आहे. पण ही घोषणाबाजी करण्यासाठी कुणीही मला उद्युक्त केलेले नव्हते
किंवा याबाबत मला कुणीही काही सांगितलेले नाही. मी एक सामान्य शेतकरी आहे. त्या अनुषंगाने मी स्वयंप्रेरणेने मोदींना कांद्यावर बोलण्यासाठी आग्रह केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते तितक्यात समोरुन घोषणा आली, “कांद्यावर बोला.. कांद्यावर बोला.” या शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या.
त्यानंतर मोदी एक क्षण थांबले, समोरुन मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या.
भारतमाता की जय या घोषणाही दिल्या. तसंच पुढे त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं.
शरद पवारांना सदर घटनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, नाशिकच नाही तर धुळे, पुणे, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये कांद्याचा प्रश्न उग्र बनला आहे.
या भागातील शेतकरी अस्वस्थ आहे. पंतप्रधान मोदी या जिल्ह्यांमध्ये येऊन जर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत नसतील तर साहजिकच कुणीतरी प्रश्न विचारणारच.
नाशिकमध्ये हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधी तर लोकांनी कांदे फेकलेले आहेत. मोदींच्या सभेत घोषणा देणारा जर आमचा कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे.