अजित पवार प्रचारातून अचानक गायब.,काय म्हणाले शरद पवार ?
Ajit Pawar suddenly disappeared from the campaign. What did Sharad Pawar say?
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची राज्यभर चर्चा असते. अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळेही अजित पवार चर्चेत असतात.
गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान, काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याने ते टीकेचे धनी बनले होते. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारातही सहभागी नसल्याचे दिसून येत आहे.
त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील महायुतीच्या सभेला ते उपस्थित न राहिल्यानं त्यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही अजित पवार गैरहजर होते. यावेळी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते.
त्यामुळे, अजित पवार नेमकं कुठं गायब झाले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर, अजित पवारांची तब्बेत बरी नसल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र, अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तसं पाहिलं तर अचानक गायब होणं अजित पवारांसाठी नवीन नाही, अजित दादा जेव्हा जेव्हा गायब झाले तेव्हा तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत अजितदादा दिसले नाहीत आणि त्यांच्या अदृश्य होण्याच्या चर्चाना पुन्हा एकदा सुरुवात झाली.
मात्र, तब्बेत बरी नसल्यानं अजितदादा आराम करत आहेत, त्यामुळेच ते सभेला आले नाहीत. मात्र, शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला अजितदादा उपस्थित राहतील असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.
अजित पवार कधी काय भूमिका घेतील याचा अंदाज कोणालाच लागत नाही . त्यामुळं ते गायब होताच सगळ्यांच्याच भुवया उंचावतात.
शरद पवारांना जेव्हा अजित पवारांच्या गायब होण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही अजित पवारांची तब्ब्येत खरंच बरी नसल्याचं सांगितलं.
अजित पवारांच्या या गायब होण्याशी, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यालाही जोडून पाहिलं जातं आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
चंद्रकात पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेच ते नाराज झाले होते. यावेळी, बारामतीत मतदान कमी होण्याला अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना जबाबदार धरलं होतं.
दरम्यान, अजित पवार गायब असल्याच्या चर्चांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र, लोकसभेची निवडणूक मध्यावर आलेली असताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानं भाजप नेते आश्चर्यचकित झाले आहेत.
वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक अर्ज दाखल केला तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे महत्वाचे नेते हजर राहिले. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी
मोदींच्या डोक्यावर जिरेटोपही घातला. पण, तरीही अजित पवारांची अनुपस्थिती सगळ्यांना जाणवली, यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात तीच लक्षवेधी ठरली.
अजित पवार गायब झाले की त्यांच्या पक्षातील त्यांचे सहकारी आणि मित्रपक्षातील नेते चिंताग्रस्त होतात. याच कारण अजित पवारांच्या गायब होण्याच्या इतिहासात दडलंय.
शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला उपस्थित राहून अजित पवार त्यांच्याबद्दलच्या या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतील. मी नाराज नाही हे देखील सांगतील.
पण अजित दादांना अनेकदा मी नाराज नाही हे सांगितल्यावर देखील त्यांच्याबद्दलचं संशयाचं वातावरण कायम राहतं, हे आतापर्यंत अनेकवेळा दिसून आलं आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.